आठवडय़ाची मुलाखत : सुंदर अय्यर, टेनिस संघटक

भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कौतुकामुळे डेव्हिस चषकाचे सामने पुन्हा आयोजित करण्याची संधी पुणेकरांना मिळेल, असा आत्मविश्वास टेनिस संघटक सुंदर अय्यर यांनी व्यक्त केला.

शिवछत्रपती क्रीडानगरीत भारत-न्यूझीलंड यांच्यातील डेव्हिस सामन्यांचे यशस्वीरीत्या येथे संयोजन करण्यात आले. तब्बल ४३ वर्षांनी पुण्याला डेव्हिस चषकाच्या आयोजनाची संधी मिळाली. या सामन्याद्वारे बऱ्याच दिवसांनी पुन्हा येथील वातावरण टेनिसमय झाले होते. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे जिल्हा महानगर टेनिस संघटना यांच्या उत्कृष्ट सांघिक कौशल्यामुळे हा योग चालून आला. या डेव्हिस सामन्याविषयी अय्यर यांच्याशी केलेली बातचीत

  • डेव्हिस चषकाचे स्वप्न साकार झाले, त्याविषयी काय सांगता येईल?

या सामन्याच्या यशस्वी संयोजनाविषयी खात्री होती, तरीही ही लढत संपेपर्यंत खेळाडूंपेक्षाही जास्त दडपण संयोजकांवर असते. सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयाचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक सहकार्यामुळेच आम्ही हे सोनेरी दिवस पाहू शकलो. तसेच या सामन्यासाठी अनेक प्रायोजक मिळाले व त्यांनी दिलेल्या अतुलनीय साहाय्यामुळे आम्हाला कधीही कोणतीही अडचण आली नाही. या सामन्याशी संलग्न असलेल्या सर्वच घटकांनी आमचे भरभरून कौतुक केले आहे. एवढेच नव्हे पुन्हा डेव्हिस चषकाच्या संयोजनाची संधी मिळाली तर त्या वेळीही मदत करण्याची खात्री दिली आहे.

  • सुरुवातीला भारतीय संघातील काही खेळाडू येथे डेव्हिस सामना घेण्याबाबत फारसे अनुकूल नव्हते. मग त्यांना तुम्ही राजी कसे केले?

गेली तीन वर्षे आम्ही पुण्यात एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. त्याखेरीज आयटीएफ स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या स्पर्धा घेत आहोत. या स्पर्धामध्ये रशिया़, सर्बिया, चीन, जपान, अमेरिका, इंग्लंड, आदी अनेक देशांमधील खेळाडू भाग घेत असतात. या ठिकाणचे आदरातिथ्य, क्रीडानगरीतील अन्य सुविधा, प्रेक्षकांचा सकारात्मक पाठिंबा यामुळे हे खेळाडू येथे येण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यामुळे भारतीय खेळाडूंनाही आपण येथे डेव्हिस चषकाचे सामने खेळले पाहिजेत असे वाटू लागले. डेव्हिस सामन्याकरिता आवश्यक असणाऱ्या सुधारणा आम्ही येथील टेनिस संकुलात केल्या. खेळाडूंकडून मिळालेल्या हिरव्या कंदिलामुळे अखिल भारतीय टेनिस संघटनेकडूनही आम्हाला या सामन्याच्या आयोजनाची परवानगी मिळाली.

  • या सामन्यामुळे पुण्याच्या टेनिसला कसे प्रोत्साहन मिळणार आहे?

गेल्या १०-१२ वर्षांमध्ये पुण्यातील टेनिसची झपाटय़ाने प्रगती झाली आहे. जवळजवळ वर्षभर येथील टेनिस कार्यरत असते असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. पावसाळ्यातदेखील येथे टेनिस सुरू असते. त्या वेळी आम्ही वेगवेगळ्या गटातील खेळाडूंची एकत्रित मिश्र पद्धतीची साखळी स्पर्धा आयोजित करीत असतो. त्यामुळे पावसाळ्यातही खेळाडूंच्या सरावात कधीही व्यत्यय आलेला नाही. येथील वर्षभर चालणारे स्पर्धात्मक टेनिस, जागतिक दर्जाचे प्रशिक्षक, भरपूर प्रायोजक व पारितोषिके, पूरक व्यायामासाठी उत्तम सुविधा, फिजिओ, वैद्यकीय व्यवस्था यामुळे महाराष्ट्राबाहेरील अनेक खेळाडू येथे नियमित सरावासाठी येत असतात.

  • टेनिसच्या प्रसार व प्रचारावर कसा भर राहणार आहे?

आम्ही केवळ पुण्याचाच विचार केलेला नाही. प्रायोजकांच्या मदतीने आम्ही औरंगाबाद, सोलापूर, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर आदी अन्य ठिकाणीही टेनिस स्पर्धाचे आयोजन करीत असतो. त्यामुळे तेथील क्रीडा नैपुण्याचाही भरपूर विकास होत आहे. त्याखेरीज प्रशिक्षकांकरिताही अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण व उद्बोधक शिबिरांचे आयोजन करीत असतो. भारतात जेवढे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आहेत त्यापैकी एकचतुर्थाश प्रशिक्षक पुण्यात आहेत. तसेच महाराष्ट्रातील पंचांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवले जात असते. पुणे व मुंबई या शहरांपुरते टेनिस हा खेळ न राहता त्याचा महाराष्ट्रात सर्वदूर विकास व्हावा, असाच आमचा प्रयत्न असतो. पुणे शहराला डेव्हिस चषकाची संधी मिळाली ही आम्ही केलेल्या आजपर्यंतच्या कार्याचीच पावती आहे.