पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी पराभव पत्कारावा लागणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघाला आणखी एक धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज एश्टन अगरला दुखापत झाली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी अगरच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात एश्टन अगरऐवजी युवा मिचेल स्विपसन याला संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियानं आपल्या टी-२० संघामध्ये फिरकी गोलंदाज नॅथन लायनला घेतलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या अधिकृत संकेतस्थाळावर याबाबतची माहिती दिली आहे.

एश्टन अगरची दुखापत किती मोठी आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, उर्वरित सामन्यात एश्टन अगर खेळण्याची शक्यता कमीच आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नॅथन लायनला टी-२० च्या चमूमध्ये संधी देताना अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रिलीज करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया ए आणि भारत यांच्यादरम्यान रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी कॅमरुन ग्रीनला रिलीज करण्यात आलं आहे. ग्रीन रविवारी ऑस्ट्रेलिया ए संघाकडून कसोटी कर्णधार टिम पेनसह खेळणार आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला दुखापत झाली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना फिंचला त्रास होत होता. शनिवारी आपण स्कॅनिंगसाठी जाणार असल्याचं फिंचने मॅच संपल्यानंतर सांगितलं. स्कॅनिंगचे रिपोर्ट आल्यानंतरच फिंचच्या उरलेल्या मॅचच्या सहभागाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार फिंचची दुखापत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. फिंच जर उर्वरित टी-२० सामन्यात खेळला नाही, तर मॅथ्यू वेडकडे नेतृत्व दिलं जाऊ शकतं. मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा उपकर्णधार आहे.

ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण –
यजमान ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला आणि टी-२० मालिकेला वॉर्नरला मुकावलं लागलं होतं. तसेच अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो मैदानात उतरलाच नाही. त्यातच भर म्हणून आता अश्टन अगर आणि कर्णधार फिंचही जखमी झाले.