महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पध्रेच्या बाद फेरीत थाटात प्रवेश केला. त्यांच्यासह भारतीय रेल्वे व कर्नाटकच्या दोन्ही संघांनी आगेकूच केली.

बुधवारी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने पुरुष गटात दिल्लीचा १५-८ असा एक डाव व ७ गुणांनी पराभव केला. कर्णधार युवराज जाधव (३.२ मि. व ३ गुण), प्रतीक वाईकर (३ मि. व २ गुण ) यांनी अष्टपैलू खेळ केला, तर मिलिंद चवरेकरने धारदार आक्रमणात पाच गडी टिपले. कोल्हापूरने १४-१० अशा एक डाव व चार गुणांच्या फरकाने गुजरातवर विजय मिळवला. संभाजी जाधवने (४.३ मि. व १.२ मि.) नाबाद संरक्षणाची खेळी केली.
नीलेश पाटील व अमीन रामदान (१.३ मि. व ३ गुण) याने अष्टपलू खेळ केला. गतविजेत्या रेल्वेने ओदिशाचा २२-६ असा १ डाव व १६ गुणांनी धुव्वा उडविला. त्यांच्या पी. आनंदकुमार व रंजन शेट्टीने प्रत्येकी सहा गडी टिपले, तर मनोज पवार व अमित पाटील यांनी अष्टपलू खेळी केली.

बाद फेरीत दाखल झालेले संघ
पुरुष : भारतीय रेल्वे, छत्तीसगड, हरियाणा, विदर्भ, केरळ, पाँडेचरी,तामिळनाडू, कर्नाटक, कोल्हापूर, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगाणा, गुजरात, महाराष्ट्र; महिला : मध्य भारत, छत्तीसगड, हरियाणा, विदर्भ, केरळ, पाँडेचरी, तामिळनाडू, कर्नाटक, कोल्हापूर, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली.