आठवडय़ाची मुलाखत : प्रशांत सुतार, महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे संचालक

टेनिस हा फक्त श्रीमंत माणसांचा खेळ आहे असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. मात्र गेल्या १०-१२ वर्षांमध्ये ग्रामीण भागातील अनेक खेळाडू या खेळात पुढे येऊ लागले आहेत. हा खेळ सर्वसामान्यांचा क्रीडा प्रकार कसा होईल, याकडे आम्ही प्राधान्य देणार आहोत, असे महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.

देशात अतिशय प्रतिष्ठेची असलेली एटीपी खुली स्पर्धा ३० डिसेंबरपासून पुण्यात सुरू होत आहे. आतापर्यंत चेन्नईत आयोजित केलेली ही स्पर्धा येथे होणार असल्यामुळे त्याबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेनिमित्त राज्यात टेनिसचा विकास करण्याची संधी येथील संघटकांना आहे. याबाबत सुतार यांच्याशी केलेली खास बातचीत-

* या स्पर्धेचे यजमानपद कसे मिळवले?

चेन्नईत अनेक वर्षे सुरू असलेली एटीपी स्पर्धा देशाबाहेर जाण्याची शक्यता आहे, असे आमच्या कानावर आले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे जिल्हा आणि महानगर टेनिस संघटना या दोन्ही संघटनांवर मी असल्यामुळे आम्ही एकत्रितरीत्या काही झाले तरी ही स्पर्धा देशाबाहेर जाऊ द्यायची नाही असा चंग बांधला. या स्पर्धेशी संलग्न असलेल्या आयएमजीआरशी आम्ही ही स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा केली. त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आम्ही सादर केला आणि सुदैवाने त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला.

* स्पर्धेस राज्य शासनाकडून आर्थिक सहकार्य मंजूर करण्यात कसे यश मिळाले?

प्रवीणसिंह परदेशी व प्रवीण दरडे हे दोघेही टेनिसचे निस्सीम चाहते आहेत. त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करता आला. स्पर्धा आयोजित करण्याबरोबर आणखी या खेळासाठी काय करणार आहात, अशी विचारणा झाल्यानंतर आम्ही राज्यात या खेळाचा कसा विकास करणार आहोत, याचा आराखडाच त्यांच्यासमोर मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने मान्यता दिली. सलग पाच वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेपुरते मर्यादित न राहता बालेवाडी येथील क्रीडानगरीतच उच्च कामगिरी टेनिस अकादमी स्थापन केली जाणार आहे. या अकादमीद्वारे राज्यात विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. सर्व ठिकाणी प्रशिक्षणाचा समान कार्यक्रम राबवला जाणार आहे. टेनिस नैपुण्य शोध व त्याचा विकास हाच मुख्य उद्देश राहणार आहे.

* ही स्पर्धा चेन्नईतून हलवल्यानंतर काही ज्येष्ठ खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती, त्याबाबत काय मत आहे? 

काही ज्येष्ठ खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांचे ते वैयक्तिक मत आहे. फेब्रुवारीमध्ये पुण्यात डेव्हिस चषक लढत संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू तसेच एटीपी स्पर्धा आयोजित करणारे आंतरराष्ट्रीय संघटक यांनीच येथे चेन्नई खुल्या स्पर्धेसारखी ही स्पर्धा आयोजित करण्याचा आग्रह धरला होता. येथील स्टेडियम व अन्य जागतिक दर्जाच्या सुविधा यामुळेच आम्हाला या स्पर्धेचे संयोजनपद मिळाले आहे.

* स्पर्धेद्वारे खेळाचा विकास कसा साधला जाणार आहे?

महाराष्ट्रातून ऑलिम्पिक व ग्रँड स्लॅम विजेते घडवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे व ती पार पाडणे हेच महाराष्ट्र खुल्या स्पर्धेमागचे ध्येय आहे. महाराष्ट्र खुली स्पर्धा आयोजित केली की आमचे काम संपले असे होणार नाही. ही स्पर्धा टेनिसच्या विकासाकरिता उत्तम व्यासपीठ असणार आहे. डेव्हिस लढतीच्या वेळी अनेक शालेय मुले-मुली बालेवाडीत आपल्या पालकांसह आले होते. या खेळाडूंच्या प्रगतीबरोबरच लाइन्समन, बॉलबॉइज, तांत्रिक अधिकारी व पंच यांच्याकरिता प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. या क्षेत्रातही रोजगाराची उत्तम संधी आहे. तसेच प्रशिक्षकांकरिता उद्बोधक शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलते नियम, प्रशिक्षणातील नवीन तंत्रज्ञान याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

* ग्रामीण भागात कसा विकास होणार आहे?

राज्य संघटनेतर्फे विविध तालुका स्तरांवर अनेक स्पर्धा सुरू केल्या आहेत. या स्पर्धासाठी ग्रामीण भागातून अनेक नवोदित खेळाडू येऊ लागले आहेत. टेनिस रॅकेट्सपासून अनेक सुविधा त्यांना विनामूल्य देण्याचा प्रयत्न राहणार आहे. रॅकेट किंवा चेंडू नाहीत म्हणून नैपुण्याचा विकास होत नाही असा प्रसंग घडणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.