इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी आता बलाढय़ संघांमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. मँचेस्टर सिटीने शनिवारी साउदम्प्टनवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवत अव्वल स्थानावरील लिव्हरपूलवर दडपण आणले आहे. या विजयासह मँचेस्टर सिटीने ३१ सामन्यांत ७० गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे. लिव्हरपूल ३२ सामन्यांत ७१ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील चेल्सीने शनिवारी रात्री होणाऱ्या सामन्यांत स्टोक सिटीवर विजय मिळवल्यास, ते लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटीला मागे टाकून अव्वल स्थानी कूच करतील. मँचेस्टर सिटी आणि साउदम्प्टन यांच्यातील सामन्यात पहिले चारही गोल पहिल्या सत्रात झाले. याया टौरेने चौथ्या मिनिटाला गोल करत मँचेस्टर सिटीचे खाते खोलले. त्यानंतर रिकी लॅम्बर्टने ३७व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून साउदम्प्टनला बरोबरी साधून दिली. हा सामना रंगतदार होणार, असे वाटत असतानाच पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत समीर नासरी आणि इडिन झेको यांनी काही सेकंदांच्या अंतराने गोल करून मँचेस्टर सिटीला ३-१ असे आघाडीवर आणले. स्टीव्हन जोव्हेटिकने ८१व्या मिनिटाला चौथ्या गोलाची भर घालत मँचेस्टर सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.