• सेंट किट्स अँड नेव्हीसविरुद्ध १-१ अशा बरोबरीनंतरही विजेतेपद
  • नऊ सामन्यांमध्ये सलग विजयानंतर पहिला अनिर्णीत निकाल
  • यजमानांकडून जॅकीचंद, तर पाहुण्यांसाठी ग्वानेचा निर्णायक गोल

‘आंधळा मागतो एक डोळा..’ या म्हणीप्रमाणे भारतीय पुरुष फुटबॉल संघाला गुरुवारी सेंट किट्स अँड नेव्हीस संघाविरुद्ध गोल करण्याच्या एक नव्हे, दोन नव्हे, तर ४-५ सोप्या संधी चालून आल्या. मात्र त्यात आलेल्या अपयशाने भारतीय संघाची नऊ सामन्यांतील विजयी मालिका खंडित झाली. तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पध्रेत जागतिक क्रमवारीत पिछाडीवर असलेल्या सेंट किट्स अ‍ॅँड नेव्हीस संघाने यजमानांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. मात्र भारताने एक विजय आणि एक अनिर्णीत निकालासह स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले.

भरपाई वेळेत रॉबिन सिंगने पेनल्टी क्षेत्रातून टोलावलेला चेंडू गोलजाळीत अलगद विसावेल असे वाटले, परंतु खांबाला लागून तो माघारी फिरला आणि भारताच्या विजयाच्या आशाही मावळल्या. अखेरची १५-२० मिनिटे प्रेक्षकांनी जागच्या जागी उभे राहून खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी केलेले सर्वतोपरी प्रयत्न निकालाअंती निष्क्रिय ठरले. पाच मिनिटांच्या भरपाई वेळेत भारताला सर्वाधिक संधी मिळाल्या, परंतु निखिल पुजारीने निराश केले. नऊ सामन्यांतील विजयानंतर भारताला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले.

बचाव हे आमचे प्रमुख अस्त्र असले तरी मागील सामन्यांतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमणावरच भर असेल, प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन यांचे सूतोवाच भारतीय पुरुष फुटबॉल संघाने तंतोतंत खरे केले. नेव्हीसविरुद्ध जॅकीचंद सिंग तेलेमच्या पहिल्या सत्रातील गोलच्या जोरावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. प्युओतरे रिको आणि मॉरिशसविरुद्धच्या लढतीत भारताने पिछाडीवरून मुसंडी मारली होती, परंतु सातत्याने पहिला गोल करण्यात अपयशी ठरणाऱ्या भारतीय संघांना कॉन्स्टनटाइन यांनी गुरुवारच्या लढतीपूर्वी चांगलेच खडे बोल सुनावले. त्यामुळेच सुरुवातीपासून नेव्हीस संघावर आक्रमणाची तोफ डागली. जे जे लाल्पेखलूआ आणि बलवंत सिंग या आक्रमणपटूंनी सुरेख ताळमेळ दाखवला, परंतु त्यांच्यात उजवी कामगिरी ठरली ती मणिपूरच्या २५ वर्षीय मध्यरक्षक जॅकीचंदची. सातत्याने आक्रमण करूनही भारताच्या वाटय़ाला गोल येत नव्हता. ३८व्या मिनिटाला जॅकीचंदने भारताला यश मिळवून दिले. मध्यरक्षक रॉवलीन बोर्गेसच्या पासवर जॅकीचंदने हवेत झेपावर हेडरद्वारे गोल केला आणि भारताने १-० अशी आघाडी मिळवली.

मध्यंतरानंतर संघातील प्रमुख आक्रमणपटू रॉबीन सिंगला मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फार काही फरक पडला नाही. रॉबिनला नेव्हिसच्या गोलरक्षकाला चकवण्यात सातत्याने अपयश आले. त्यात बदली खेळाडू म्हणून आलेल्या निखिलने भर घातली. खेळाडूंच्या या ढिसाळ कामगिरीने कॉन्स्टनटाइन यांची होणारी चिडचिड प्रकर्षांने जाणवली. त्यात कर्णधार संदेश झिंगनलाही आपला संताप लपवता आला नाही. ७१व्या मिनिटाला बदली खेळाडू अ‍ॅमोरी ग्वानेने बायसिकल किक मारून केलेल्या गोलनंतर भारतीय चाहते नि:शब्द झाले. आत्तापर्यंत जागेवर बसून भारताच्या विजयाचे स्वप्न रंगवणारे हे चाहते अखेरची काही मिनिटे उभे राहून यजमानांना प्रोत्साहित करत होती. या निकालाने भलेही ते निराश झाले असले तरी सर्वोत्तम खेळ ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळाली, या समाधानाने त्यांनी स्टेडियम सोडले.