अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदांसाठी संभाव्य दावेदारांमध्ये गणना होणाऱ्या मारिया शारापोव्हाला सिनसिनाटी स्पर्धेत उपान्त्य फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या अ‍ॅना इव्हानोव्हिकने शारापोव्हावर ६-२, ५-७, ७-५ असा विजय मिळवला. अन्य लढतीत सेरेना विल्यमसने कॅरोलिन वोझ्नियाकीला नमवत अंतिम फेरीत स्थान पटकावले. जेतेपदासाठी सेरेना आणि अ‍ॅनामध्ये मुकाबला रंगणार आहे.
इव्हानोव्हिकने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्येही तिने ५-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेत ती विजयासमीप पोहोचली. मात्र यानंतर तिच्या खेळाचा दर्जा घसरला. पाच ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या शारापोव्हाने आव्हान जिवंत राखण्यासाठी आपला खेळ उंचावत दुसरा सेट जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र अ‍ॅनाने तडफदार खेळ करीत सरशी साधली.
तिसऱ्या सेटमध्ये प्रकृती खालावल्याने अ‍ॅनाला वैद्यकीय उपचारही घ्यावे लागले. मात्र याने तिच्या खेळावर कोणताही परिणाम जाणवला नाही.
मारिया लढवय्या खेळाडू आहे. तिसऱ्या सेटमध्ये प्रचंड उष्णतेमुळे मला अशक्त वाटू लागले. उपचारानंतर बरे वाटले आणि मी खेळावर लक्ष केंद्रित केले. हा विजय समाधानकारक आहे अशा शब्दांत अ‍ॅनाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सेरेनाने वोझ्नियाकीवर २-६, ६-२, ६-४ अशी मात केली. पहिला सेट जिंकत वोझ्नियाकीने दमदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर सेरेनाच्या झंझावातापुढे ती निष्प्रभ ठरली.
सेरेना आणि अ‍ॅना यंदाच्या हंगामात चौथ्यांदा आमनेसामने असणार आहेत.