रिलायन्स फाऊंडेशन यूथ चॅम्प्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क वेसन यांचे मत

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : फुटबॉलच्या बाबतीत भारत झोपलेला राक्षस आहे, असे बोलले जायचे. पण भारतीय फुटबॉलचा दर्जा गेल्या काही वर्षांत सुधारला आहे. एफसी गोवा, बेंगळूरु एफसी, रिलायन्स फाऊंडेशन यूथ चॅम्प्स कार्यक्रम यामुळे भारतीय फुटबॉलची युरोपियन फुटबॉलशी तुलना केली जात आहे. भारतात अफाट गुणवत्ता आहे, ती शोधून काढण्याचे आणि तिला घडवण्याचे काम सुरू आहे. काही प्रमाणात युरोपियन फुटबॉलच्या तुलनेत भारत मागे असेलही. पण आता भारतीय फुटबॉलही युरोपियन फुटबॉलच्या दर्जाइतकी उंची गाठू लागला आहे, असे मत रिलायन्स फाऊंडेशन यूथ चॅम्प्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क वेसन यांनी सांगितले.

नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क फुटबॉल मैदानावर मँचेस्टर युनायटेड, चेल्सी, साऊदम्प्टन एफसी आणि यूथ चॅम्प्स या प्रीमियर लीग-इंडियन सुपर लीग नेक्स्ट जनरेशन मुंबई चषक फुटबॉल स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.

‘‘भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. युरोपप्रमाणेच अनेक क्लब भारतात आहेत. त्यामुळे तळागाळातील गुणी खेळाडू शोधून काढणे हे जिकिरीचे काम आहे. पण तरीही देशातील दर्जेदार खेळाडू शोधून त्यांना घडवण्याचे कार्य सुरू आहे. देशात आता बेबी लीग, यूथ लीग यांसारख्या स्पर्धा होत आहेत. त्यामुळे भारतीय फुटबॉलची प्रगती योग्य दिशेने होत आहे, असे मला वाटते. पण त्याने आनंद मानण्याची गरज नाही. ही फक्त सुरुवात आहे. अजून बरेच कार्य करावे लागेल. भारतीय महिलांची कामगिरी पुरुषांपेक्षा जास्त चांगली होत आहे. त्यामुळे फिफा विश्वचषकात खेळण्याचे भारताचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकेल,’’ असे नेदरलँड्सच्या मार्क यांनी सांगितले.

यूथ चॅम्प्स कार्यक्रमाविषयी मार्क यांनी सांगितले की, ‘‘गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या यूथ चॅम्प्सची एक तुकडी विशेष प्रशिक्षण घेऊन आताच बाहेर पडली असून त्यातील एका फुटबॉलपटूने स्पेनच्या क्लबशी करार केला आहे. गुणवत्तेच्या जोरावर त्याला स्पेनच्या क्लबने आपल्या संघात घेतले आहे. बाकीचे सात खेळाडू व्यावसायिक स्तरावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.

सध्याच्या घडीला देशभरातील ६९ युवा खेळाडू आमच्याकडे प्रशिक्षण घेत असून त्यांना सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून घडविणारा हा कार्यक्रम आहे. भारताचे खेळाडू युरोपमधील क्लबशी करारबद्ध होऊ लागल्याने भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे मला वाटते.’’

भारत २०२६चा विश्वचषक खेळेल – नीता अंबानी

२०२६च्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जगातील ४८ देशांना खेळण्याची संधी मिळणार असून आशियातून आठ संघांना पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. सध्या आशियामध्ये भारतीय संघ १६व्या स्थानी आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने मोठी झेप घेतली आहे. अशीच प्रगती यापुढेही होत राहिल्यास, भारत विश्वचषकामध्ये नक्की खेळेल, अशी आशा रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच ‘फिफा’ परिषदेच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी व्यक्त केली.

यूथ चॅम्प्सची मँचेस्टर युनायटेडवर मात

जगातील फुटबॉलमध्ये बलाढय़ समजल्या जाणाऱ्या मँचेस्टर युनायटेडच्या युवा संघाला घरच्या मैदानावर धूळ चारण्याची किमया रिलायन्स फाऊंडेशन यूथ चॅम्प्स संघाने केली. सुरुवातीपासूनच मँचेस्टरला कडवी टक्कर देत यूथ चॅम्प्सने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. आपल्या सर्वागसुंदर खेळाने यूथ चॅम्प्स संघाने उपस्थितांची मने जिंकली. राशिद सी. के. याने सामन्याच्या मध्यंतरानंतर महत्त्वपूर्ण गोल करत यूथ चॅम्प्सला आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर यूथ चॅम्प्सने बाजी मारली.