विश्वचषकाआधी बांगलादेशच्या मश्रफी मुर्तझाने पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.

गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. त्याच्या काही काळ आधी बांगलादेशचे दोन मातब्बर क्रिकेटपटू हे राजकारण प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या बातम्या झळकू लागल्या. मश्रफी मुर्तझा आणि अष्टपैलू शकिब अल हसन ही दोन मोठी नावे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आली. दोघांनी बांगलादेशच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च अधिकाऱ्याची भेट घेतली. यापूर्वीदेखील माजी कर्णधार नइमूर रहमान दुजॉय, फुटबॉलपटू अरिफ खान जॉय आणि अब्दुस सलाम मुर्शीदी हे खेळाडू बांगलादेशच्या राजकारणात आले आहे. त्यामुळे या दोघांचीही नावे चर्चेत आल्याने सर्वाना ते खरेच वाटले; पण या वृत्ताचा उलटा परिणाम होऊन बांगलादेशचे जनमानस या दोघांच्या विरोधात मतप्रदर्शन करू लागले. विश्वचषक अवघ्या सहा महिन्यांवर आलेला असताना हे दोघे राजकारणात आले तर बांगलादेशचा संघ विश्वचषकात अधिकच कमकुवत बनेल. त्यामुळे बांगलादेशच्या क्रिकेटप्रेमींनी समाजमाध्यमांवर त्याबाबत रोष व्यक्त करण्यास प्रारंभ केला. त्याची दखल घेत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या दोन्ही क्रिकेटपटूंची भेट घेऊन सध्या क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. राजकारणाच्या खेळात येण्यापूर्वी तुमच्या खेळात चित्त एकाग्र करून खेळा, असा सल्ला थेट पंतप्रधानांनीच दिल्याने तूर्तास या दोघांनी राजकारण प्रवेश लांबणीवर टाकला आहे; परंतु विश्वचषकानंतर ते दोघे केव्हाही राजकारणात उतरू शकतील, अशीच चिन्हे आहेत.

मनगटी फिरकीपटू नसल्याची नाराजी

बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढाईत यश मिळवत सर्वाना आश्चर्यचकित केले. बांगलादेशचा संघ या विजयाचा जल्लोष साजरा करीत असले तरी भारताविरुद्धच्या सराव सामन्यातील कामगिरीवर बांगलादेशी क्रिकेटप्रेमी अद्यापही नाराज आहेत. तसेच त्याची कारणमीमांसादेखील त्यांनी करून ठेवली आहे. ती म्हणजे बांगलादेशच्या संघाकडे कुणीही मनगटी फिरकीपटू नसल्यामुळे त्यांना तशा प्रकारची फिरकी खेळण्याचा सराव नाही. बांगलादेशकडे अर्धवेळ फिरकीपटू शब्बीर रेहमान असला तरी तो विशेषज्ञ फिरकीपटू म्हणून प्रभाव पाडू शकलेला नाही. अन्य संघांपैकी केवळ विंडीजकडे हे शस्त्र नाही. शिम्रॉन हेटमायर काही प्रमाणात मनगटी फिरकी टाकतो, मात्र त्यांचा कर्णधार जेसन होल्डर त्याचा खूप कमी वापर करतो. मात्र बांगलादेशकडे मनगटी फिरकीपटू नसल्यामुळे त्यांना भविष्यात फटका बसू शकतो, अशी भीती बांगलादेशच्या चाहत्यांना वाटत आहे.