भारतात सट्टेबाजीला केंद्र सरकारने कायदेशीर परवानगी न देणेच हितकारक ठरेल. कारण सट्टेबाजीला चालना दिल्यास सामना निश्चितीचे प्रकार बळावतील, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शबीर हुसैन शेखादम खांडवाला यांनी व्यक्त केले.

देशात सट्टेबाजीला कायदेशीर परवानगी दिल्यास सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल, असा दावा काही जणांकडून केला जात होता. परंतु त्याला विरोध करताना खांडवाला म्हणाले की, ‘‘सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही, हा सरकारचा प्रश्न आहे. परंतु सट्टेबाजीमुळे सामना निश्चितीचे प्रकार बोकाळतात, हे एक पोलीस अधिकारी म्हणून मी सांगू इच्छितो. सध्या तरी सरकारने मान्यता न देऊन योग्यच भूमिका घेतली आहे.’’

सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्याने खेळातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळेल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी प्रमुख अजित सिंग यांनी म्हटले होते. केंद्रीय मंत्री आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीसुद्धा सट्टेबाजीला मान्यता द्यावी, अशी सूचना केली होती.

‘आयपीएल’ला सशर्त परवानगी -मलिक

*  मुंबईतील ‘आयपीएल’ सामन्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी स्पष्ट केले. ‘आयपीएल’ सामन्यांचे आयोजन करताना ‘बीसीसीआय’ने महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

वानखेडेवर सराव करण्याची मुभा

*  आगामी ‘आयपीएल’साठी मंगळवारपासून खेळाडूंना वानखेडे स्टेडियमवर रात्री आठ वाजल्यानंतर सराव करता येईल, असे राज्य शासनाने सोमवारी जाहीर केले. राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील ‘आयपीएल’ सामन्यांबाबत साशंका व्यक्त होत होती. परंतु शासनाने सामन्यांच्या आयोजनासह सरावालाही परवानगी दिली आहे. त्यानुसार क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे ४ ते ६.३० या वेळेत तर वानखेडेवर सायंकाळी ७.३० ते रात्री १० या वेळेत खेळाडूंना सराव करता येणार आहे. तसेच करोनाची लागण झालेल्या १० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला असल्याची माहिती ‘एमसीए’ने दिली.