* पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग करणार विंदू आणि मयप्पन यांची चौकशी
* श्रीशांतने दोन ललना सट्टेबाजांना पुरवल्याचा संशय
* विंदूचे पंच रौफ यांच्याशी संबंध
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षांचा जावई गुरुनाथ मयप्पन हा फक्त चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मानद सदस्य होता, असे इंडिया सिमेंट कंपनीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते खरे, पण आज दस्तुरखुद्द मयप्पन याने आपले चेन्नईच्या संघाशी घनिष्ठ संबंध असल्याची कबुली दिली आहे. आता यापुढे मयप्पन आणि त्याला गोवणारा विंदू यांची चौकशी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत जी चौकशी करण्यात आली ती दृक्श्राव्य माध्यमात संग्रहित (व्हिडीओ रिकॉर्डिग) ठेवली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
‘स्पॉट फिक्सिंग’ हे फक्त पैसे आणि भेटवस्तूपर्यंत मर्यादित नव्हते तर यामध्ये ललनांचाही वापर केला जात असल्याचे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. जुहूमधील ऑकवूड आणि नोव्होटेल या हॉटेल्समधील सीसीटीव्ही चित्रीकरणातून काही बाबी पुढे आल्या असून या हॉटेलमध्ये विंदूसहित पवन आणि प्रेम तनेजा हे दोघे सट्टेबाजही राहत होते. या वेळी एस. श्रीशांतबरोबर दोन मॉडेल्स होत्या. त्यामुळे कझाकिस्तानच्या या दोन मॉडेल्सना हॉटेलमध्ये श्रीशांतने बोलावलो होते आणि त्या सट्टेबाजांना पुरवल्या होत्या, असा संशय व्यक्त केला जात आहे. १६ आणि १७ मेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन्ही हॉटेल्समध्ये या दोन्ही मुली या सट्टेबाजांबरोबर असल्याचे समोर आले आहे. विंदूने या दोन्ही मॉडेल्सना सट्टेबाजांच्या खोलीत पाठवले होते. या दोन्ही कझाकिस्तानच्या मॉडेल्स ‘प्रवासी व्हिसा’वर भारतात आल्या होत्या. या दोन्ही मॉडेल्सना पकडण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पवन आणि प्रेम हे राजस्थानमधील मोठे प्रस्थ आहेत, राजस्थानमध्ये त्यांची ज्वेलर्सची दुकाने असून त्यांचे राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याची माहितीही पुढे आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने विक्रम अगरवाल ऊर्फ व्हिक्टर आणि अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू यांना समन्स बजावले आहे. टिंकूची तिहार तुरुंगातून मुंबईच्या दिशेने रवानगी करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी गोल्डन एक्सप्रेसने त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत आल्यावर मुंबई पोलीस टिंकूला कोर्टात सादर करून त्याच्या कोठडीची मागणी करतील. पोलिसांनी दिल्लीतील व्यावसायिक आनंद सक्सेना याला समन्स बजावले असून त्याचा या सट्टेबाजीमध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सक्सेना काही वर्षांपूर्वी सट्टेबाजी करायचा, पण आता तो व्यावसायिक झाला असून त्याचे दिल्लीतील एका मोठय़ा राजकीय घराण्याच्या जावयाशी घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे.
विंदूच्या आयपॅडमध्ये दडलंय काय?
विंदूने आपल्या आयपॅडमधील काही बाबी पुसून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. विंदूने १६ मे रोजी पाकिस्तानचे पंच असद रौफ यांना ‘आता अटकसत्र सुरू झाली असून ‘सिम कार्ड’ची योग्य ती व्यवस्था करून पाकिस्तानात पळून जा,’ असे सांगितले असल्याची माहिती पुढे येत असल्याचे सूत्रांना सांगितले आहे. विंदूच्या आयपॅडमधील पुसून टाकलेली माहिती मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून ही माहिती हाती आल्यास काही मोठी नावे चर्चेत येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे सट्टेबाज हाती लागणार नाहीत
मुंबई पोलिसांनी काही सट्टेबाजांना अटक केल्यावर याप्रकरणी पाकिस्तानातील सट्टेबाजांचा संबंध असल्याचे पुढे आले होते. पोलिसांनी पाकिस्तानातील सट्टेबाजांचे दूरध्वनी क्रमांक मिळवले असले तरी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, त्यामुळे पाकिस्तानचे सट्टेबाज हाती लागणार नसल्याचेच चित्र आहे.