मुंबईत क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून (एमसीए) क्रिकेट प्रशासक म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळलेल्या शरद पवार यांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्याच वेळेस वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याबाबतही ‘एमसीए’कडून पवार यांचा सल्ला घेण्यात आला आहे.

‘‘वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करायचे असल्याने आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. जर सुरक्षित अंतर राखले तर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीला परवानगी मिळावी, अशी विनंती आम्ही पवार यांना केली,’’ असे ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत गेले चार महिने करोनामुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प आहे. मुंबईत पुन्हा क्रिकेट सुरू करण्याबाबतही पवार यांचा सल्ला घेण्यात आल्याचे ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पवार हे ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष आहेत.