आशियाई क्रीडा स्पर्धा ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी असते. त्यामुळेच मी आगामी आशियाई स्पर्धेत किमान कांस्यपदक मिळवेन,  असा आत्मविश्वास भारताच्या अ‍ॅथलेटिक्स संघात निवड झालेला धावपटू राहुलकुमार पाल याने व्यक्त केला. राहुल हा दक्षिण कोरियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मूळचा अमेठी जिल्ह्य़ातील हा खेळाडू पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये सेवेत आहे. आशियाई स्पर्धेविषयी व आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी त्याच्याशी केलेली ही बातचीत..
*आशियाई स्पर्धेत पदकाची कितपत संधी आहे ?
आजपर्यंत मी युवा ऑलिम्पिक स्पर्धा, कनिष्ठ आशियाई मैदानी स्पर्धा, जागतिक कनिष्ठ गट स्पर्धा आदी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगले यश मिळवले आहे. श्रीलंकेतील आशियाई कनिष्ठ गट स्पर्धेत मी ५ हजार व १० हजार मीटर धावणे या दोन्ही शर्यतींमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. तेथील अनुभव मला कोरियातील स्पर्धेत उपयुक्त ठरणार आहे. आशियाई स्पर्धेत मला प्रामुख्याने जपान व कतार या देशांच्या स्र्पधकाचे आव्हान असणार आहे.
*परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो का?
होय. सध्या आशियाई स्पर्धेसाठी आम्हाला रशियाचे ज्येष्ठ प्रशिक्षक डॉ. निकोलाई यांचे मार्गदर्शन मिळत आहे. परदेशी खेळाडूंच्या तुलनेत आम्ही नेमके कोणत्या शैलीत कमी पडतो, याबाबत ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती वाढविण्यासाठीही त्यांच्याकडून मोलाच्या सूचना मिळत असतात.
*लांब अंतराच्या शर्यतीत कारकीर्द घडवावी, असे तुला का वाटले?
मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासून आमच्या गावात आम्ही शाळेत धावत जात असत. तेव्हापासूनच धावण्याची आवड निर्माण झाली. माझ्या वडिलांचे मित्र कमलेशकुमार यांनी माझी धावण्याची आवड लक्षात घेऊन मला मध्यम अंतराच्या शर्यतीत भाग घेण्यास सांगितले व त्यादृष्टीने मार्गदर्शनही केले. लांब अंतराच्या शर्यतीमध्ये पदकांची अधिक संधी आहे हे लक्षात आल्यानंतर मी त्या शर्यतीकडे वळलो.
*तुझ्या कारकिर्दीविषयी आई-वडिलांना काय वाटते ?
माझ्या शर्यती टेलिव्हिजन पाहिल्या की त्यांना खूप आनंद होतो. गावातील अन्य लोकांना ते माझी शर्यत पाहण्यासाठी आवर्जून सांगतात. मला पदक मिळाल्यानंतर ते मिठाई वाटतात. आपल्या मुलाने भारताचा नावलौकिक वाढवावा अशी त्यांची इच्छा असते.
*आजपर्यंतच्या कारकिर्दीत एएसआयचा किती वाटा आहे ?
अ‍ॅथलेटिक्समध्ये मी जे काही कमावले आहे, त्यामध्ये एएसआयचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपटूसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व सवलती मला तेथे मिळतात. पोषक आहार, अत्यानुधिक साधनांची पूरक व्यायामशाळा, अनुभवी प्रशिक्षक आदींबाबत तेथे कसलीच कमतरता नाही.  
*आंतरराष्ट्रीय स्तरावरील शर्यतींमध्ये दडपण येते का?
सहसा मी कोणतेही दडपण घेत नाही. एएसआयमध्ये आम्हाला शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीबाबतही विशेष मार्गदर्शन मिळते. एकाग्रता वाढविण्यासाठी, मानसिक दडपण घालविण्यासाठी अधूनमधून विशेष सराव शिबिरही तेथे घेतले जात असते. त्याचाही फायदा आम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या वेळी होत असतो.
*अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द करताना मुख्य ध्येय कोणते आहे?
अर्थातच ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे. या स्पर्धेत पदक मिळवित ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे.