गेल्या काही दिवसांपासून #MeTooची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या संदर्भात BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांच्यावर महिला पत्रकाराने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. परिणामी सिंगापूर येथे होणाऱ्या ICCच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीला राहुल जोहरी यांनी न जाण्याचे आदेश प्रशासकीय समितीने जोहरी यांना दिले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत मंडळाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी हे BCCIचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

बॉलिवूडमधील काही जुनी प्रकरणे #MeToo मुळे पुढे आली आहेत. त्यानंतर मागच्या आठवड्याभरात हे वादळ क्रिकेट विश्वात आले. पण भारतीय क्रिकेट यापासून दूर होते. परंतु २ दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमध्येही #MeTooच्या वादळाने शिरकाव केला आणि BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांना त्याचा फटका बसला.

एका महिला पत्रकाराने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. @PedestrianPoet या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये ‘मीडिया क्षेत्रातील काही बड्या लोकांच्या नावांचा समावेश असलेले इ-मेल माझ्याकडे आहेत. पण पीडित महिलेने सगळ्यांची नावे न घेण्याची विनंती केली आहे. राहुल जोहरी. तुमची वेळ संपली. #MeToo’ अशी पोस्ट केली आहे.

त्यामुळे जोहरी यांना ICCच्या बैठकीला जाण्यास नकार देण्यात आला आहे.