गेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला नमवत जेतेपद पुन्हा एकदा आपल्या नावावर केले होते. पण यंदाच्या स्पर्धेत बाद फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना न्यूझीलंडला नमवणे अपरिहार्य असेल. जर त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांना अजून एक संधी मिळू शकते, पण हा सामना गमावला तर त्यांना श्रीलंकेला नमवावे लागेल आणि दुसरीकडे इंग्लंडने सामना गमावला तरच त्यांना बाद फेरीचे दरवाजे खुले होऊ शकतात. पण सध्याचा त्यांचा फॉर्म हा चांगला नसून पाठीच्या दुखापतीमुळे मायकेल क्लार्कही खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाची बुधवारी अग्निपरीक्षाच असेल. दुसरीकडे श्रीलंकवर विजय मिळवलेल्या न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास त्यांच्यासाठी बाद फेरीत सहजपणे प्रवेश करता येणार आहे. पण अनुभवी खेळाडू डॅनियल व्हेटोरीची या सामन्याच्या समावेशाबाबत संदिग्धता आहे.
न्यूझीलंडची गोलंदाजी चांगली होत असली तरी त्यांची फलंदाजी आत्मघातकी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात साऱ्यांनी ते पाहिले आहेच. मिचेल मॅक्लेनघान आणि टिम साऊथी ही त्यांची प्रभावी अस्त्रे आहेत. पण फलंदाजीमध्ये सुधारणा न केल्यास त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाचा पेपर कठीण ठरू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला क्लार्कच्या दुखापतीचा जबर फटका बसलेलाच आहे. शेन वॉटसन हा त्यांचा हुकमी एक्का अजून चाललेला नाही. जेम्स फाऊन्कर चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला अपेक्षित साथ मिळताना दिसत नाही.
प्रतिस्पर्धी संघ
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्क्युलम (कर्णधार), डग ब्रेसवेल, इयान बटलर, गँट्र एलियट, जेम्स फ्रँकलिन, मार्टीन गप्तील, मिचेल मॅक्लेनघान, नॅथन मॅक्क्युलम, कायले मिल्स, कॉलन मुनरो, ल्यूक राँची, टिम साऊथी, रॉस टेलर, डॅनियल व्हेटोरी आणि केन विल्यमसन.
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), जेम्स फाऊल्कनर, नॅथन काइल्टर-निल, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, शेन वॉटसन, झेव्हियर डोहर्टी, फिलीप ह्य़ुजेस, क्लिंट मकाय, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅडम व्होग्स आणि डेव्हिड वॉर्नर.
सामन्याची वेळ : दु. ३ वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि ‘स्टार क्रिकेट २’वर