भारताकडे २१३ धावांची आघाडी . रहाणेचे मायदेशातील पहिले शतक . जडेजाची जादुई फिरकी .

मोहाली, नागपूरचीच पुनरावृत्ती नवी दिल्लीत पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेची ‘फिरकीची रडकथा’ फिरोझशाह कोटला स्टेडियमवरसुद्धा पुन्हा दिसून आली. सकाळच्या सत्रात अजिंक्य रहाणेच्या संयमी शतकाच्या बळावर भारताने ३३४ धावसंख्या उभारली, मग दिवसअखेर फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने ‘पंचतारांकित’ कामगिरी बजावत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त १२१ धावांत गुंडाळण्याची किमया साधली. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यावर नियंत्रण प्रस्थापित करताना २१३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
जडेजाने आपल्या लाजवाब फिरकीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ फक्त ३० धावांत गारद केला. त्यामुळे ४९.३ षटकांत त्यांचा डाव आटोपला. पाहुण्या संघाला पूर्ण दोन सत्रसुद्धा खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. फॉलोऑन टाळण्यासाठी आफ्रिकेला १३५ धावांची आवश्यकता होती, मात्र त्यांना १४ कमी पडल्या. पण भारताने आफ्रिकेवर फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला. त्याआधी रहाणेने (१२७) मायदेशात प्रथमच शतक झळकावले.
डावुखरा फिरकी गोलंदाज जडेजा एकीकडे कोटलाच्या खेळपट्टीवर पराक्रम गाजवत असताना उमेश यादव (२/३२) आणि इशांत शर्मा (१/२८) यांनीही आफ्रिकेच्या फलंदाजांना डोके वर काढू देण्याची संधी दिली नाही. रविचंद्रन अश्विनने २६ धावांत २ बळी घेत आपली बळींची संख्या २६पर्यंत वाढवली. याशिवाय सकाळच्या सत्रात अश्विनने अर्धशतकसुद्धा साकारले.
पहिल्या तीन कसोटी सामन्यांप्रमाणे फिरकीला पूर्णत: साथ देणारी खेळपट्टी नसतानाही दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मानसिकदृष्टय़ा खचलेलेच जाणवले. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे पितळ पुन्हा उघडे पडले.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एकीकडे हजेरी लावून परतत असताना ए बी डी’व्हिलियर्स पुन्हा झुंजार वृत्तीने लढला आणि त्याने ४२ धावा केल्या. तंबूत परतणारा तो नववा फलंदाज ठरला. जडेजाच्या गोलंदाजीवर लाँग-ऑफला इशांत शर्माने त्याचा अप्रतिम झेल घेतला.
सामन्याचे तीन पूर्ण दिवस शिल्लक असून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० असा ऐतिहासिक कसोटी विजय मिळवण्याची चिन्हे आहेत. पुनरागमन करणाऱ्या यादवने डीन एल्गरला (१७) बाद करून आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने त्याचा झेल टिपला. चहापानानंतर मात्र जडेजाने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. फॉर्मात नसलेल्या स्टियान व्हान झिलची जागा घेणाऱ्या सलामीवीर तेंबा बवुमाने २२ धावा केल्या. मात्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. हशिम अमला (१) भारतीय भूमीवर पुन्हा अपयशी ठरला. स्क्वेअर कट खेळण्याचा अमलाचा प्रयत्न फसला आणि साहाने यष्टीपाठी त्याचा झेल घेतला.
३ बाद ५६ धावसंख्येवरून आफ्रिकेची मग ४ बाद ६२ अशी अवस्था झाली. कारण फॅफ डू प्लेसिसला भोपळासुद्धा फोडता आला नाही. पहिल्या स्लिपमधील रहाणेने बॅकवर्ड शॉर्ट लेगला जाऊन त्याचा सुरेख झेल घेतला. जीन-पॉल डय़ुमिनीचा (१)अडथळा यादवने दूर केला. इशांतने डेन व्लिासचा (११) त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर अश्विनने कायले अ‍ॅबॉट (४) आणि डेन पीट (५) यांचे बळी मिळवले.
त्याआधी, रहाणेने रहाणेने २१५ चेंडूंत १२७ धावांची खेळी साकारताना चालू मालिकेत शतक नोंदवणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने ११ चौकार आणि ५ षटकारांसह आपली खेळी साकारली. याचप्रमाणे अश्विन (५६) सोबत आठव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. या मालिकेत प्रथमच तीनशेचा टप्पा ओलांडला गेला.

मला अन्य फलंदाजांसोबत भागीदारी करीत संघाचा डाव बांधायचा होता. अश्विनसोबत फलंदाजी करताना साकारलेले शतक हे माझ्यासाठी खास आहे. संजय बांगर आणि रवी शास्त्री यांनी मला आधी मैदानावर पाय रोवून उभा रहा आणि प्रत्येक वेळी येणाऱ्या चेंडूचा फक्त विचार कर. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीतच मी पदार्पण केले होते आणि याच मैदानावर शतक साकारल्याचा आनंद वेगळाच आहे. -अजिंक्य रहाणे, भारताचा फलंदाज

अजिंक्य रहाणे

१२७ धावा

२१५ चेंडू

११ चौकार

४ षटकार
धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. अमला गो. पीट १२, शिखर धवन पायचीत गो. पीट ३३, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. अ‍ॅबॉट १४, विराट कोहली झे. व्हिलास गो. पीट ४४, अजिंक्य रहाणे झे. डी’व्हिलियर्स गो. ताहीर १२७, रोहित शर्मा झे. ताहीर गो. पीट १, वृद्धिमान साहा त्रि. गो. अ‍ॅबॉट १, रवींद्र जडेजा झे. एल्गर गो. अ‍ॅबॉट २४, रविचंद्रन अश्विन झे. डी’व्हिलियर्स गो. अ‍ॅबॉट ५६, उमेश यादव नाबाद १०, इशांत शर्मा पायचीत गो. अ‍ॅबॉट, अवांतर (बाइज ८, वाइड १, नोबॉल ३) १२, एकूण ११७.५ षटकांत सर्व बाद ३३४.
बाद क्रम : १-३०, २-६२, ३-६६, ४-१३६, ५-१३८, ६-१३९, ७-१९८, ८-२९६, ९-३३४, १०-३३४
गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल २४-५-५८-०, कायले अ‍ॅबॉट २४.५-७-४०-५, डेन पीट ३८-६-११७-४, इम्रान ताहीर १६-२-६६-१, डीन एल्गर ११-०-३३-०, जीन-पॉल डय़ुमिनी ४-०-१२-०.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : डीन एल्गर झे. साहा गो. यादव १७, टेंबा बवुमा त्रि. गो. जडेजा २२, हशिम अमला झे. साहा गो. जडेजा ३३, ए बी डी’व्हिलियर्स झे. इशांत गो. जडेजा ४२, फॅफ डू प्लेसिस झे. रहाणे गो. जडेजा ०, जीन-पॉल डय़ुमिनी त्रि. गो. यादव १, डेन व्हिलास त्रि. गो. इशांत शर्मा ११, कायले अ‍ॅबॉट पायचीत गो. अश्विन ४, डेन पीट झे. रहाणे गो. जडेजा ५, मॉर्नी मॉर्केल नाबाद ९, इम्रान ताहीर झे. बदली (लोकेश राहुल) गो. अश्विन १, अवांतर (बाइज ५, नोबॉल १) ६, एकूण ४९.३ षटकांत सर्व बाद १२१
बाद क्रम : १-३६, २-४०, ३-५६, ४-६२, ५-६५, ६-७९, ७-८४, ८-१०३, ९-११८, १०-१२१
गोलंदाजी : इशांत शर्मा १२-५-२८-१, उमेश यादव १२-३-३२-२, रविचंद्रन अश्विन १३.३-५-२६-२, रवींद्र जडेजा १२-२-३०-५.