न्यूझीलंडबरोबर सुरु असलेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं आहे. सेडन पार्क, हॅमिल्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजनं नाबाद ९९ धावांची खेळी केली. ४० व्या वर्षी हाफिजने केलेल्या ९९ धावांच्या तुफानी खेळीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव केला. मात्र या सामन्यात ४० वर्षीय मोहम्मद हाफिजचीच चर्चा झाली. कारण त्न्यानं आपल्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी प्रदर्शन केले. हाफिजनं ५७ चेंडूत ९९ धावांची तुफानी खेळी केली आहे. ५ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने हाफिजनं टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीचं प्रदर्शन केले. टीम साऊदीने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत पाहुण्या संघाची हालत ३ बाद ३३ अशी केली. मात्र यानंतर अनुभवी मोहम्मद हाफीजने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली.

न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९ गडी राखत धुव्वा उडवून मालिकेवर कब्जा केला आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडकडे आता २-० अशी विजयी आघाडी आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान न्यूझीलंडने टीम सेफर्ट आणि केन विल्यमसन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. सेफर्टने ८४ तर विल्यमसनने ५७ धावा केल्या.