सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिहेरी तोंडी तलाकची प्रथा घटनाबाह्य़ व बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिला होता. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करणे, चांगलेच महागात पडले. तिहेरी तलाकला घटनाबाह्य ठरवण्याच्या न्यायालयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना सुरक्षा मिळेल. महिलांना समानतेचा हक्क देणाऱ्या या निर्णयाची गरजच होती, असे ट्विट मोहम्मद कैफने केले होते. सुरूवातीला काही ट्विटरकरांनी कैफच्या या कृतीचे कौतुक केले. मात्र, त्यानंतर अनेकजण मोहम्मद कैफच्या या विधानावर अक्षरश: तुटून पडले. एखाद्या विषयाचे ज्ञान आणि पुरेशी माहिती असल्याशिवाय बोलू नये, असा टोला एका ट्विटरकराने कैफला लगावला.

 

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तिहेरी तलाकसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला. सहा महिन्यात संसदेत कायदा करावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तीनदा तलाक उच्चारून महिलांना तोंडी तलाक देण्याच्या प्रथेला घटनाबाह्य़ ठरवून त्यावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उपेक्षित असलेल्या मुस्लीम महिलांना न्याय मिळाला, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. या निकालानंतर मुस्लिम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत अनेकांनी या निकालाचे स्वागत केले. बॉलिवूडपासून पाकिस्तानमधील कलाकारांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.