भारतीय क्रिकेट संघातील ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा कटू निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते. गेल्या दोन वर्षांपासून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. पण त्याला संधी मिळाली नाही. याशिवाय यंदा झालेल्या आयपीएलमध्येही त्याला चमक दाखवता आली  नव्हती, सध्या सुरू असलेल्या विश्वचषकासाठीच्या संघनिवडीतही त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे निवृत्तीचा विचार त्याच्या मनात घोळत होता अखेर बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्याने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.


युवराजच्या निवृत्तीनंतर सर्व स्तरातून त्याला शुभेच्छा देणाऱ्या आणि भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या आठवणींना उजाळा देणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि युवराजचा मित्र मोहम्मद कैफ याचीही प्रतिक्रिया आली. इंग्लंडविरुद्ध 2002 साली नॅटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात कैफ आणि युवराज या जोडीने भारताकडून 6 व्या विकेटसाठी 121 धावांची अविसमरणीय भागीदारी केली होती.  ‘क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा मॅचविनर…एक लढवय्या ज्याने विविध आव्हानांवर मात करत कारकिर्द घडवली आणि प्रत्येक वेळी विजयी ठरला…आम्हाला सर्वांना तुझा खूप अभिमान आहे युवराज सिंग…या देशासाठी तू जे काही केलंयस त्याबद्दल तुला स्वतःलाही नक्कीच अभिमान वाटायला हवा’. अशी प्रतिक्रिया कैफने ट्विटरद्वारे दिली आहे.


याशिवाय,  कायम आपल्या ट्विटमुळे चर्चेत असणाऱ्या वीरेंद्र सेहवागनेही स्पेशल ट्विट केले आणि एक खास फोटोदेखील पोस्ट केला आहे. “खेळाडू येतील आणि जातील. पण युवराजसारखे खेळाडू सापडणे अत्यंत कठीण आहे. युवराजच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, पण त्याने गोलंदाज व आजाराला ठोकून काढले आणि चाहत्यांची मनं जिंकली. त्याच्या या झुंजार प्रवासामुळे आणि इच्छाशक्तीमुळे त्याने अनेकांना प्रोत्साहन दिले. युवराज, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”, असे ट्विट सेहवागने केले.

युवराजने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नाची दिलखुलास उत्तरं दिली. सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू BCCI ला या बाबतची विनंती केली नाहीस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना युवराज म्हणाला की मला अशा पद्धतीचे क्रिकेट आवडत नाही. मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही. मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला निरोपाचा सामना खेळायला मिळेल आणि त्यानंतर मला निवृत्त व्हावे लागेल, असे मला सांगण्यात आले होते. पण मला त्या पद्धतीचा निरोप कधीही नको होता. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितले की जर मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला कोणीही इतर लोकं सांगण्याआधी मी स्वतःहून घरी निघून जाईन आणि निवृत्ती स्वीकारेन.

युवराजचे वडील हे अतिशय शिस्तीचे आहेत. त्यांनीच युवराजला क्रिकेटमध्ये येण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे युवराजच्या निवृत्तीबाबत त्यांचे मत काय? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. याबाबतही युवराजने दिलखुलास उत्तर दिले. युवराज म्हणाला की मी माझ्या वडिलांच्या साठी क्रिकेटमध्ये आलो. ते स्वतः उत्तम क्रिकेटर होते. पण त्यांनाकिर्केट विश्वचषक उंचावता आला नाही. त्यामुळे त्यांनी ते स्वप्न माझ्यात पाहिले. सुदैवाने त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करू शकलो. २००७ चा टी २० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक असे दोन विश्वचषक उंचावण्यात मी माझा मोलाचा वाटा उचलला असे मला वाटते, त्यामुळे माझ्या वडिलांना माझ्या या कारकिर्दीनंतरच्या निवृत्तीवर नक्कीच अभिमान वाटत आहे, असेही युवराजने सांगितले.