३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. त्याआधी सर्व संघ सध्या सराव सामन्यांमध्ये व्यस्त आहेत. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला विराट कोहलीचा भारतीय संघही सध्या इंग्लंडमध्ये कसून सराव करतोय. मात्र भारताच्या दोन माजी खेळाडूंची दहशत इंग्लंडमध्ये अजुनही कायम आहे. हे दोन्ही खेळाडू आहेत, मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह.

विश्वचषकानिमीत्त कार्यक्रमासाठी हे दोन्ही खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत. यावेळी मोहम्मद कैफने युवराज सिंहसोबतचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या फोटोवर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने, नेटवेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्यातील आठवणींचा दाखला देत कैफ आणि युवराजचं कौतुक केलं.

इंग्लंडमध्ये झालेल्या नेटवेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला होता. कैफने अखेरपर्यंत किल्ला लढवत शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने ऐतिसाहीक लॉर्ड्सच्या मैदानावर टी-शर्ट हवेत फिरवत केलेलं सेलिब्रेशन अजुनही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.