दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज फॅनी डी’व्हिलियर्सकडून स्तुतिसुमने

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मालिका गमावली असून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज फॅनी डी’व्हिलियर्सने मात्र भारताच्या एका खेळाडूवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे आणि तो आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. भारतीय संघाच्या तोफखान्यातील शमी हा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, असे मत फॅनीने व्यक्त केले आहे.

‘‘शमीच्या गोलंदाजीमध्ये चांगला वेग आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्य आहे. ज्या दिशेने ग्लेन मॅग्रा, शॉन पोलॉक आणि इयान बोथम गोलंदाजी करायचे किंवा ज्या पद्धतीने डेल स्टेन मारा करतो, तीच गोष्ट शमीमध्ये पाहायला मिळते. तो एक चांगला आऊट स्विंगर आहे. या साऱ्या गोष्टींमुळेच तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज ठरतो,’’ असे फॅनी म्हणाला.

मालिकेतील दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये शमीचा दुसरा क्रमांक आहे. त्याच्या नावावर दोन सामन्यांमध्ये नऊ बळी आहेत.

‘‘भारताला जर परदेशामध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर शमी हा संघाचा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगाबरोबर चांगला स्विंगही पाहायला मिळतो. शमीनंतर भुवनेश्वर हा भारताचा चांगला गोलंदाज आहे. पण त्याला दुसरा कसोटी सामन्यात न खेळवल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला,’’ असे फॅनीने सांगितले.