ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचं ५३ व्या वर्षी हैदराबादमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं. शुक्रवारी सिडनीमध्ये मोहम्मद सिराज सराव करत होता. सराव करुन सिराज परतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी वडिलांच्या निधनाबाबद सूचित केलं.  बीसीसीआयनं सिराजच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केली आहे. बीसीसीआयकडून शनिवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी सिराजला वडिलांच्या निधनानंतर मायदेशी परतण्याची ऑफर दिल्याचं सांगितलं.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वडिलांच्या निधनामुळे मायदेशात परतण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु राष्ट्रीय कर्तव्यासाठी ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय त्याने घेतला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी दिली. ‘‘फुप्फुसांच्या आजारामुळे सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. याबाबत ‘बीसीसीआय’ने त्याच्याशी चर्चा केली. त्याच्यासमोर भारतात परतण्याचा पर्याय ठेवण्यात आला. मात्र त्याने भारतीय संघासमवेत राहण्याचा निर्णय स्पष्ट केला,’’ असे शाह यांनी सांगितले.

वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. मागील रणजी हंगामात हैदराबादकडून ४१ बळी घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. २०१६-१७ च्या रणजी हंगामात हैदराबादकडून खेळत असताना सिराजने ४१ बळी घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर सिराजला आयपीएलमध्ये RCB च्या संघाकडून संधी मिळाली. तेराव्या हंगामात सिराजने RCB कडून खेळताना आश्वासक मारा केला होता. सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला – सिराज

“माझे बाबा नेहमी म्हणायचे की माझा मुलगा देशाचं नाव मोठं करेल. आता मी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक कठोर मेहनत घेईन. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी रिक्षा चालवत अनेक कष्ट केले आहेत. माझ्यासाठी ही खरंच धक्कादायक गोष्ट होती. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार मी गमावला. मला देशाकडून खेळताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं.” सिराज सिडनीवरुन Sportstar संकेतस्थळाशी बोलत होता.