भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. धोनीने बुधवारी लष्कराच्या एका प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. त्यावेळी धोनीने तब्बल १२ हजार फुटांवरून पॅराशुटच्या सहाय्याने उडी मारली. धोनी हा २०११ सालापासून टेरिटोरियल आर्मीमध्ये असून, सध्या तो लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावर आहे. धोनी गेले दोन आठवडे आग्रा येथील पॅरा ट्रेनिंग स्कूलमध्ये पॅरा जम्पर होण्याचा सराव करत होता. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धोनीने एएन ३२ विमानातून १२ हजार फूटांवरुन पॅराशूटसह उडी घेतली. मात्र, धोनीला हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवसा आणखी तीन वेळा आणि रात्रीच्यावेळी एकदा पॅराजम्पिंग करावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला पॅराजम्पर म्हणून सर्टिफिकेट आणि विंग्ज मिळतील. दरम्यान, हा माझ्यासाठी सन्मान असून मला नेहमीच लष्करात सामील व्हायचे होते, अशी भावना धोनीने या पॅराजम्पिंगनंतर व्यक्त केली.
dhoni paraglader jump