भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीच्या या निर्णयाने सर्वजण स्तब्ध झाले. वास्तविक प्रत्येकाला असा विचार होता, की धोनी मैदानातूनच या खेळाला निरोप देईल. मात्र, तसे झाले नाही आणि धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती. माजी निवडकर्ते शरणदीप सिंह यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये निवडकर्ते धोनीची निवड करणार असल्याचे शरणदीप सिंह यांनी सांगितले, पण करोनामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे धोनी निवृत्त झाला.

शरणदीप सिंह न्यूज नेशनशी बोलताना म्हणाले की, ”गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकप झाला असता, तर धोनी त्यात खेळला असता आणि त्याला निरोपाचा सामना देण्यात आला असता. २०१९च्या विश्वचषकातील पराभवापासून धोनीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित होत होते. धोनीचा स्ट्राइक रेट सातत्याने घसरत होता, त्यानंतर तत्कालीन मुख्य निवडक एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंतला अधिक संधी देण्याचे सांगितले होते. मात्र, आता धोनीला टी-२० विश्वचषकात स्थान मिळणार होते, असा दावा शरणदीप सिंह करत आहेत.

हेही वाचा – भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनला मिळालं ऑलिम्पिकचं तिकीट

धोनीला टी-२० विश्वचषक स्पर्धेध्ये भाग घ्यायचा होता आणि त्याने मैदानातूनच खेळाला निरोप देण्यास प्राधान्य दिले असते, असे शरणदीप सिंह यांच्या दाव्यावरून स्पष्ट झाले आहे, पण करोनामुळे हे शक्य झाले नाही. टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२० ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता, पण करोनामुळे ते पुढे ढकलले गेले. ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० विश्वचषक आता २०२२ मध्ये होणार आहे.