विश्वचषकानंतर एम.एस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला उधान आले आहे. धोनीच्या निवृत्तीवर अनेक क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. यामध्ये आता धोनीचे रांचीतील लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांचीही भर पडली आहे. धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे त्याच्या आई-वडिलांची इच्छा असल्याचे केशव बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

धोनीच्या निवृत्तीवर आतापर्यंत बीसीसीआयने अधिकृतरित्या कोणताही खुलासा केला नाही. केशव बॅनर्जी यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केलं आहे. केशव बॅनर्जी यांनी रविवारी धोनीच्या घरी भेट दिली. धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशी त्याच्या आई-वडिलांनी इच्छा व्यक्त केली.

स्पोर्ट्स तक या संकेत स्थळाशी बोलताना केशव बॅनर्जी म्हणाले की, ‘धोनीचे आई वडिल मला म्हणाले की, सर्व प्रसारमाध्यमांना वाटतेय की धोनीने निवृत्ती घ्यायची ही योग्य वेळ आहे. आम्हालाही तसेच वाटतेय. धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. आता आम्हाला ऐवढी संपत्ती हाताळता येत नाही. धोनीने सर्वकाही पहावे.’

यावर धोनीच्या आई-वडिलांना बॅनर्जी म्हणाले की, ‘गेल्या दहा-बारा वर्षांपासून तूम्ही यशस्वीपणे संपत्ती सांभाळत आहात. अजून एकवर्ष तूम्ही ती सांभाळावी. ३८ वर्षीय धोनी आणखी एक वर्षतरी क्रिकेट खेळेल. ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे.’

भारतीय संघाचे विश्वचषकात न्यूझीलंडविरोधात झालेल्या उपांत्य सामन्यात आव्हान संपुष्टात आले. ९ साखळी सामन्यात भारतीय संघाने सात विजयासह १५ गुणांची कमाई केली होती. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. विश्वचषक स्पर्धेत धोनीने आठ डावांत २७३ धावा केल्या. यामध्ये ७७ धावांची खेळी सर्वोच्च होती.