तडाखेबंद अर्धशतकी खेळी; मुंबईचा गोव्यावर सहा गडी राखून शानदार विजय

इंदूर : दुखापतीतून सावरल्यानंतर मागील तीन सामन्यांत झगडणाऱ्या पृथ्वी शॉ याला अखेर सूर गवसला. त्याच्या ७१ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर मुंबईने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या क गटात गोव्याचा सहा गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला.

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १४० धावा केल्या. कर्णधार अमोघ देसाईने सर्वाधिक ३८ धावा केल्या. याशिवाय सगुण कामत (२७), अमित वर्मा (२७)आणि कीनन वाझ (२६) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाम्स मुलानी, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर आणि शुभम रांजणे यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला.

त्यानंतर, पृथ्वी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (३१) ही सलामीची जोडी या स्पर्धेतील तीन सामन्यांनंतर प्रथमच जुळली. त्यांनी ९५ धावांची भागीदारी रचून मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. पृथ्वीने फक्त ४७ चेंडूंत पाच चौकार आणि सात षटकारांसह ७१ धावा केल्या. दर्शन मिसाळने त्याला बाद केले. मग सातत्याने धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला फक्त दोन धावांवर तंबूत पाठवण्यात गोव्याने यश मिळवले. परंतु सूर्यकुमार यादवने (नाबाद २४) मुंबईला १० चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ४ बाद १४० (अमोघ देसाई ३८, अमित वर्मा २७; शाम्स मुलानी १/२०) पराभूत वि. मुंबई : १८.२ षटकांत ४ बाद १४१ (पृथ्वी शॉ ७१, अजिंक्य रहाणे ३१; अमोघ देसाई १/१५.)