३७ चेंडूत ८६ धावांची वेगवान खेळी; गोलंदाजीत १५ धावांत २ बळी; दिल्लीवर ८० धावांनी मात

कृणाल पंडय़ाच्या अष्टपैलू प्रदर्शनाच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ८० धावांनी मात केली. कृणालच्या खेळीच्या बळावर मुंबईने २०६ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीचे फलंदाज नियमित अंतरावर बाद झाले आणि त्यांचा डाव १२६ धावांतच संपुष्टात आला. या विजयासह मुंबईने बाद फेरीत प्रवेशाच्या आशा जिवंत राखल्या आहेत. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कृणाललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून दिल्लीने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा आणि मार्टिन गप्तील जोडीने ४६ धावांची सावध सुरुवात केली. अमित मिश्राने रोहितला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३१ धावांची खेळी केली. यानंतर गप्तील आणि कृणाल पंडय़ा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान या जोडीने इम्रान ताहीरच्या तिसऱ्या षटकात २३ धावा फटकावल्या. शाहबाझ नदीमच्या गोलंदाजीवर षटकार खेचत कृणालने २२ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील कृणालचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या गप्तीलला झहीर खानने माघारी धाडले. त्याने ४२ चेंडूंत ४८ धावांची खेळी केली. गप्तील बाद झाल्यानंतर कृणालने सामन्याची सूत्रे हाती घेत चौकार, षटकारांची बरसात केली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या कृणालचा झंझावात ख्रिस मॉरिसने थोपवला. त्याने ३७ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ८६ धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याच षटकात मॉरिसने धोकादायक पोलार्डला बाद करत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली. उर्वरित दोन षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी ताहीरच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. यंदाच्या हंगामात विक्रम ताहीर सर्वात महागडा ठरला होता. त्याने ४ षटकांत ५९ धावा दिल्या होत्या. अंबाती रायुडूने ५ चेंडूंत १३ तर जोस बटलरने ९ चेंडूंत १८ धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीच्या फलंदाजांनीही कोणताही प्रतिकार न करता गुडघे टेकल्याने त्यांचा डाव १२६ धावांतच संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : २० षटकांत ४ बाद २०६ (कृणाल पंडय़ा ८६, मार्टिन गप्तील ४८; ख्रिस मॉरिस २/३४) विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.१ षटकांत सर्व बाद १२६ (क्विंटन डी कॉक ४०; जसप्रीत बुमराह ३/१३, कृणाल पंडय़ा २/१५)