पहिल्या डावात १७६ धावा; तामिळनाडू दुसऱ्या डावात ६ बाद १५३

तामिळनाडूला स्वस्तात बाद केल्यावर मोठी धावसंख्या रचण्याचे स्वप्न मुंबईचा संघ बघत होता. पण पहिल्या डावात त्यांना १७६ धावांवर समाधान मानावे लागले. या धावसंख्येसह त्यांनी सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळवली आहे. दिवसअखेर तामिळनाडूची २ बाद १५३ अशी स्थिती असून त्यांच्याकडे एकूण ६४ धावांची आघाडी आहे.

गुरुवारच्या ४ बाद ८५ धावांवरून पुढे खेळताना मुंबईने स्थिरस्थावर झालेल्या दोन्ही फलंदाजांना लवकर गमावले, या दोघांनाही अर्धशतक पूर्ण करता आले नाही. कर्णधार आदित्य तरेने पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४८ धावा केल्या, कौस्तुभ पवारने तीन चौकारांच्या मदतीने ३५ धावा करत तरेला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६३ धावा केल्या. तामिळनाडूकडून के. विघ्नेशने मुंबईचा अर्धा संघ गारद केला.

तामिळनाडूने दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात केली. अभिनव मुकुंदने आठ चौकारांच्या जोरावर ५६ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने ४० धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी १०७ धावांची सलामी देत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली होती. पण डावखुरा फिरकीपटू विजय गोहिलने सुंदरला बाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर सात धावांमध्ये अभिनवला वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने तंबूत धाडले.

हे दोघे बाद झाल्यावर तामिळनाडूने ३९ धावांमध्ये चार फलंदाज गमावले आणि दिवसअखेर त्यांची ६ बाद १५३ अशी स्थिती झाली. मुंबईकडून गोहिलने तीन आणि धवलने दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू : ८७ आणि ५४ षटकांत ६ वबाद १५३ (अभिनव मुकुंद ५६, वॉशिंग्टन सुंदर ४०; विजय गोहिल ३/३६, धवल कुलकर्णी २/२९)

मुंबई (पहिला डाव) : ६७ षटकांत सर्व बाद १७६ (आदित्य तरे ४८, कौस्तुभ पवार ३५; के. विघ्नेश ५/४१).