यंदाच्या विजय हजारे करंडकासाठी अनुभवी फलंदाज वसीम जाफरकडे विदर्भ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. फैज फजलच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. फजल दुखापतीमधून बाहेर पडल्यानंतर तो विजय हजारे करंडकाच्या उर्वरित सामन्यांसाठी नेतृत्व करणार आहे. विदर्भ क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे. त्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही स्थान दिले आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या महत्वाच्या सामन्यात उमेशने भेदक गोलंदाजी करत सामना विदर्भच्या बाजूने झुकवला होता.

विदर्भने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले. फजलने आपल्या कर्णधारपदाच्या काळात विदर्भ संघाला लागोपाठ दोन वेळा रणजीचे विजेतेपद मिळवून दिले आहे. पण दुलीप करंडकाच्या वेळी फजलला दुखापत झाली होती. VCA चे अध्यक्ष आनंद जयस्वाल म्हणाले की फजलवर सध्या उपचार सुरु आहेत. पण तो संघात खेळण्याइतका तंदुरुस्त नाही. त्यामुळे आम्ही काही काळासाठी जाफरला हंगामी कर्णधार म्हणून नेमले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत २४ सप्टेंबरला विदर्भचा संघ आपला पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळणार आहे.

विदर्भ संघ  – वसीम जाफर (कर्णधार), आर. संजय, अथर्व तायडे, गणेश सतीश, ऋषभ राठोड, अपूर्व वानखेडे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षय वाडकर, अक्षय वाखरे, अक्षय कर्णेवार, आदित्य सरवटे, उमेश यादव, यश ठाकूर, दर्शन नळकांडे आणि श्रीकांत वाघ.