ऋषिकेश बामणे

देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकेकाळी नावलौकिक असलेल्या मुंबईची कामगिरी सध्या ढासळत असताना इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामासाठी गुरुवारी झालेल्या लिलावातही त्याचे परिणाम दिसून आले. मुंबईतील बहुतांश खेळाडूंच्या पदरी निराशा पडली आहे.

चेन्नईत गुरुवारी झालेल्या लिलावासाठी मुंबईचे एकूण सात खेळाडू उपलब्ध होते, परंतु त्यापैकी फक्त डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आणि अष्टपैलू शिवम दुबे यांच्यावरच बोली लावण्यात आली. अर्जुनला गतविजेत्या मुंबई इंडियन्सने २० लाखांच्या मूळ किमतीत संघात स्थान दिले, तर शिवमला राजस्थान रॉयल्सने ४ कोटी, ४० लाख रुपयांत खरेदी केले.

गतवर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे, संकटमोचक फलंदाज सिद्धेश लाड, शाम्स मुलानी, अरमान जाफर, फिरकीपटू अथर्व अंकोलेकर हे पाच मुंबईकर मात्र दुर्लक्षित राहिले. सिद्धेश गतवर्षी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी लाभली नाही. जानेवारीत झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत मुंबईला घरच्या मैदानावर खेळूनसुद्धा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. २०१८-१९ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजय हजारे स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मुंबईला एकाही स्पर्धेची किमान उपांत्य फेरीही गाठता आलेली नाही. मुंबईच्या खराब कामगिरीमुळेच खेळाडूंनाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, हे यंदाच्या लिलावानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे एकीकडे ‘आयपीएल‘मध्ये मुंबई इंडियन्स वर्चस्व गाजवत असताना मुंबईचा संघही लवकरच स्थानिक स्पर्धामधील मक्तेदारी पुन्हा सिद्ध करेल, अशी आशा आहे.

महाराष्ट्र, विदर्भाचे खेळाडूही कमनशिबी

मुंबईप्रमाणेच महाराष्ट्र आणि विदर्भातील क्रिकेटपटूंकडेही संघमालकांनी कानाडोळा केला. पुण्याच्या केदार जाधवला सुदैवाने सनरायजर्स हैदराबादने लिलावाच्या दुसऱ्या फेरीत संघात सहभागी करून घेतले, तर विदर्भाच्या उमेश यादवला दिल्ली कॅपिटल्सने स्थान दिले. परंतु नौशाद शेख, दिग्विजय देशमुख, निखिल नाईक, अक्षय वाखरे यांच्यासाठी कोणीही बोली लावली नाही.

यंदाच्या ‘आयपीएल‘ लिलावात अष्टपैलू खेळाडूंना संघमालकांची पसंती मिळाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनेक खेळाडूंसाठी अपेक्षेहून अधिक बोली लागली. मुंबईसह महाराष्ट्राच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष होण्याचे कारण म्हणजे त्यांची गेल्या दोन वर्षभरातील स्थानिक स्पर्धामधील कामगिरी. विशेषत: मुंबईचा संघ रणजीशिवाय मर्यादित षटकांच्या सामन्यातसुद्धा निराशाजनक खेळ करत आहे. त्यामुळे संघमालक आता अन्य राज्यातील खेळाडूंवर बारीक लक्ष ठेवून त्यांनाच प्राधान्य देतात. मुंबईने स्थानिक पातळीवर कामगिरी उंचावल्यास आपसूकच तेथील क्रिकेटपटूंनाही ‘आयपीएल‘मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

— लालचंद राजपूत, भारताचे माजी क्रिकेटपटू