औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित राज्य अजिंक्यपद आणि चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये सांगली तर महिलांमध्ये मुंबई उपनगरने जेतेपदावर नाव कोरले. पुरुष गटात सांगलीने मुंबई उपनगरला १३-११ असे दोन गुणांनी नमवत जेतेपद पटकावले. दोन्ही संघांना अवघे ४ गुण सूर मारून मिळवता आले. संपूर्ण सामना संरक्षणाच्या ताकदीवरच खेळला गेला. मध्यंतराला सांगलीकडे एका गुणाची आघाडी होती. मात्र त्यानंतर संरक्षणात लागोपाठ दोन बळी टिपून सांगलीने सामना आपल्या बाजूकडे वळवला. सांगलीतर्फे युवराज जाधवने अष्टपैलू खेळ केला. नरेश सावंत आणि किरण सावंतने त्याला चांगली साथ दिली.
महिलांमध्ये चुरशीच्या सामन्यात टायब्रेकरमध्ये मुंबई उपनगरच्या संघाने सातारा संघावर १ मिनिट, ३२ सेकंद या संरक्षण वेळेत १ मिनिट आणि ३ सेकंदांत गडी टिपून विजय मिळवला. सातत्याने बरोबरीत चाललेल्या या सामन्यात जादा डावातही १३ विरुद्ध १३ ही कोंडी फोडण्यासाठी लघुत्तम आक्रमणाचा डाव खेळवला गेला. सामना हातातून निसटणार असे वाटत असतानाच उपनगरच्या शिल्पा जाधवने उत्कृष्ट स्तंभात गडी टिपूनच विजय मिळवून दिला. शिल्पा जाधव, कीर्ती चव्हाण आणि श्रुती सपकाळ या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
पुरुषांमध्ये अष्टपैलू खेळाडूचे पारितोषिक युवराज जाधवला तर महिलांमध्ये शिल्पा जाधवला देण्यात आले.
पुरुषांमध्ये नरेश सावंत उत्कृष्ट आक्रमकपटू तर महिलांमध्ये करिश्मा नगारजी पुरस्काराची मानकरी ठरले. तेजस शिरसकर आणि प्रियंका येळे सवरेत्कृष्ट संरक्षक ठरले.