News Flash

सूर्यकुमारच्या झंझावातापुढे कर्नाटक निष्प्रभ

प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर पृथ्वी (३०) आणि आदित्य तरे (१२) यांनी आक्रमक सुरुवात केली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईचा गतविजेत्यांवर सात गडी राखून शानदार विजय

सुरतच्या सीबी पटेल स्टेडियमवर सोमवारी कर्णधार सूर्यकुमार यादवची (५३ चेंडूंत, नाबाद ९४ धावा) बॅट तळपली. त्याने साकारलेल्या तुफानी अर्धशतकाला पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे यांच्या फटकेबाजीची उपयुक्त साथ लाभल्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अव्वल साखळीतील ‘ब’ गटात गतविजेत्या कर्नाटकला सात गडी आणि सहा चेंडू राखून धूळ चारली.

शार्दुल ठाकूर आणि फिरकीपटू शाम्स मुलानी यांनी लोकेश राहुल (०), कर्णधार मनीष पांडे (४) आणि करुण नायर (८) यांना बाद करून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकची ३ बाद १९ धावा अशी अवस्था केली. मात्र रोहन कदम (७१) आणि देवदुत पड्डिकल (५७) यांच्या अर्धशतकांमुळे कर्नाटकने २० षटकांत ६ बाद १७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर पृथ्वी (३०) आणि आदित्य तरे (१२) यांनी आक्रमक सुरुवात केली. परंतु त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अनुभवी श्रेयस अय्यरही (१४) लवकर माघारी परतल्यामुळे मुंबईचा संघ ११ षटकांत ३ बाद ९० धावा अशा संकटात सापडला होता. परंतु सूर्यकुमारचे फलंदाजीसाठी आगमन होताच सामन्याचे चित्र पालटले. त्याने अवघ्या ३२ चेंडूंत अर्धशतक साकारतानाच शिवमसह (नाबाद २२) चौथ्या गडय़ासाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १९ व्या षटकातच विजयी लक्ष्य गाठले. सूर्यकुमार ५३ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ९४ धावा फटकावून नाबाद राहिला.

 

.. तरच मुंबई उपांत्य फेरीत

गतविजेत्या कर्नाटकने पहिल्या तीन सामन्यांतील विजयांमुळे ‘ब’ गटातून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले असून मुंबईला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बुधवारी रंगणाऱ्या अव्वल साखळीतील अखेरच्या सामन्यात पंजाबला मोठय़ा फरकाने पराभूत करणे अनिवार्य आहे.

मुंबईच्या खात्यात कर्नाटकविरुद्धच्या विजयामुळे तीन लढतींतून आठ गुण जमा असून तूर्तास ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्थानावर असलेल्या तमिळनाडूला (तीन सामन्यांत आठ गुण) झारखंडने नमवावे, यासाठीही मुंबईला साकडे घालावे लागणार आहेत.

जर मुंबई आणि तमिळनाडू या दोघांनीही अखेरचे सामने जिंकले अथवा गमावले, तर निव्वळ धावगतीच्या आधारावर वरचढ ठरणारा संघ उपांत्य फेरी गाठेल. सध्या तमिळनाडूची (०.४१३) निव्वळ धावगती मुंबईपेक्षा (-०.५८९) सरस आहे.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक : २० षटकांत ६ बाद १७१ (रोहन कदम ७१, देवदुत पड्डिकल ५७; शार्दुल ठाकूर २/२९) पराभूत वि. मुंबई : १९ षटकांत ३ बाद १७४ (सूर्यकुमार यादव नाबाद ९४, पृथ्वी शॉ ३०; श्रेयस गोपाळ १/१९).

गुण : मुंबई ४, कर्नाटक ०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:38 am

Web Title: mumbai won by seven wickets akp 94
Next Stories
1 मुश्ताक अली  क्रिकेट स्पर्धा : गतउपविजेत्या महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर
2 प्रो हॉकी लीगची कामगिरी ऑलिम्पिकसाठी निर्णायक!
3 स्कॉटिश खुली बॅडमिंटन स्पर्धा : स्कॉटिश ‘लक्ष्य’भेद!
Just Now!
X