रहाणे, पृथ्वी अपयशी; पहिल्या दिवसअखेर रेल्वेची ५ बाद ११६ अशी मजल

कसोटी विशेषज्ञ अजिंक्य रहाणे आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यामुळे बुधवारी मुंबईने रेल्वेपुढे शरणागती पत्करली. रणजी करंडक करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील लढतीत मुंबईचा पहिला डाव फक्त ११४ धावांत कोसळला.

वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईचा डाव प्रथमच उपाहारापूर्वीच संपुष्टात आला. त्यानंतर मुंबईचा पदार्पणवीर दीपक शेट्टीने (३/२०) रेल्वेची ५ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था केली होती. त्यामुळे रेल्वेलाही शतकापार जाणे कठीण होते; परंतु कर्णधार कर्ण शर्मा (२४*) आणि अरिंदम घोष (५२*) यांनी सहाव्या गडय़ासाठी केलेल्या नाबाद ७३ धावांच्या भागीदारीच्या बळावर रेल्वेने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ११६ अशी मजल मारली. अपुऱ्या प्रकाशामुळे दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांनी खेळ थांबवण्यात आला.

त्याआधी, रेल्वेने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी दिली. परंतु रेल्वेचा मध्यगती गोलंदाज टी. प्रदीपने ३७ धावांत ६ बळी घेत मुंबईच्या भक्कम फलंदाजीच्या फळीला सुरुंग लावले. मध्यमगती गोलंदाज अमित मिश्राने त्याला अप्रतिम साथ देताना ४१ धावांत ३ बळी घेतले.

सलामीवीर पृथ्वी (१२) आणि जय बिस्ता (२१) यांनी पहिल्या गडय़ासाठी १८ धावांची भागीदारी केली. मिश्राच्या (३/४१) गोलंदाजीवर पृथ्वीचा गलीमध्ये प्रथम सिंगने टिपला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रहाणेला धावांचा आलेख उंचावण्याची नामी संधी होती. परंतु प्रदीपने रहाणेचा अडसर दूर करून आपला बळी घेतला. दुसऱ्या स्लीपमध्ये मृणाल देवधरने त्याचा झेल घेतला. प्रदीपने मग लगेच बिस्ताला तंबूत पाठवले. यष्टीरक्षक नितीन भिलेने हा झेल घेतला आणि मुंबईची ३ बाद ४० अशी अवस्था झाली.

मग संकटमोचक फलंदाज सिद्धेश लाड (१४) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (३९) यांनी चौथ्या गडय़ासाठी ३० धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्यमगती गोलंदाज हिमांशू सांगवानने (१/३३) सिद्धेशचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. त्यानंतर आदित्य तरे (४), आकाश पारकर (२), शाम्स मुलानी (१) आणि शार्दूल ठाकूर (०) खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाही. त्यामुळे रेल्वेला वर्चस्वाची संधी मिळाली. मुंबईकडून सूर्यकुमारने ४० चेंडूंत पाच चौकारांसह सर्वाधिक ३९ धावा केल्या. तो बाद झाल्यावर मुंबईचा डाव २८.३ षटकांत ११४ धावांत गडगडला.

रेल्वेची सुरुवातसुद्धा खराब झाली. १२व्या षटकात शेट्टीने प्रथम सिंगला (९) तंबूची वाट दाखवली. त्यानंतर नितीन भिले (०), मृणाल देवधर (१२) आणि नवनीत विर्क (०) झटपट बाद झाल्यामुळे १ बाद २० नंतर रेल्वेची ४ बाद ३२ अशी केविलवाणी अवस्था झाली. मध्यमगती गोलंदाज आकाश पारकरने दिनेश मोरला (९) बाद केल्यामुळे रेल्वेचा निम्मा संघ ४३ धावांत गारद झाला; पण कर्ण आणि अरिंदम यांनी संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. चहापानानंतर सात मिनिटांनी रेल्वेकडे दोन धावांची नाममात्र आघाडी जमा असताना खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला.

संक्षिप्त धावफलक

* मुंबई (पहिला डाव) : २८.३ षटकांत सर्व बाद ११४ (सूर्यकुमार यादव ३९, जय बिस्ता २१; टी. प्रदीप ६/३७)

* रेल्वे (पहिला डाव) : ३७ षटकांत ५ बाद ११६ (अरिंदम घोष खेळत आहे ५२, कर्ण शर्मा खेळत आहे २४; दीपक शेट्टी ३/२०)

सूर्यग्रहणामुळे रणजी सामन्यांना विलंब

मुंबई : सूर्यग्रहणामुळे गुरुवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबई-रेल्वे आणि उत्तर प्रदेश-सौराष्ट्र यांच्यातील सामने निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू होणार आहेत. रणजीचे सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतात. मात्र गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सामन्यांना सुरुवात होईल. मुंबई आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी बुधवारी सायंकाळी याविषयी अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे, तर सौराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील लढत राजकोटला सुरू आहे.