News Flash

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, मरे यांची आगेकूच

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, गतविजेता अँडी मरे यांनी पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

| September 5, 2013 01:31 am

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, मरे यांची आगेकूच

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, गतविजेता अँडी मरे यांनी पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचप्रमाणे महिला गटात गतविजेती सेरेना विल्यम्स आणि चीनच्या ली ना हिनेदेखील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत २०११मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या जोकोव्हिच याने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स याचा ६-३, ६-०, ६-० असा केवळ ७९ मिनिटांत धुव्वा उडविला. त्याने कारकिर्दीत १८व्यांदा ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. त्याला आता मिखाईल युझिनी याच्याशी लढत द्यावी लागणार आहे. युझिनी याने २००१ चा विजेता लिटन ह्य़ुईट याच्यावर पाच सेट्सच्या लढतीनंतर विजय मिळविला. हा सामना त्याने ६-३, ३-६, ६-७ (३-७), ६-४, ७-५ असा जिंकला. या सामन्यातील चौथ्या सेटमध्ये युझिनी हा १-४ असा पिछाडीवर होता. पुन्हा पाचव्या सेटमध्येही तो २-५ असा पिछाडीवर होता. मात्र दोन्ही वेळा युझिनी याने चिवट झुंज देत सेट जिंकण्यात यश मिळविले.
तिसऱ्या मानांकित मरे याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याच्यावर ६-७ (५-७), ६-१, ६-४, ६-४ असा विजय मिळविला. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण राखून विजयश्री खेचून आणली. मरे याला नवव्या मानांकित स्टॅनिस्लास वॉवरिंक याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. वॉवरिंक याने पाचव्या मानांकित टॉमस बर्डीच याला पराभवाचा धक्का दिला. हा सामना त्याने ३-६, ६-१, ७-६ (८-६), ६-२ असा जिंकला.
सेरेनाचा झंझावती विजय
महिलांच्या गटात सेरेना विल्यम्स या गतविजेत्या खेळाडूने १८व्या मानांकित कार्ला सोरेझ नॅव्हेरो हिचा ६-०, ६-० असा फडशा पाडला. तिने केलेल्या झंझावती खेळापुढे कार्लाचा बचाव सपशेल निष्प्रभ ठरला. सेरेना हिने आतापर्यंत या स्पर्धेत केवळ १३ गेम्स गमावल्या आहेत. यापूर्वी १९८९मध्ये मार्टिना नवरातिलोवा हिने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियाच्या मॅन्युएला मलीवा हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला होता.सेरेना हिला आता चीनची खेळाडू ली ना हिच्याशी खेळावे लागणार आहे. ली ना हिने रशियाची खेळाडू २४ वी मानांकित खेळाडू एकतेरिना माकारोवा हिला ६-४, ६-७ (५-७), ६-२ असे पराभूत केले. दोन वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धाजिंकणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने तेरावी मानांकित खेळाडू अ‍ॅना इव्हानोविच हिला ४-६, ६-३, ६-४ असे हरविले. अ‍ॅना हिने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा उठवित अझारेन्काने हा सामना जिंकला.
पेस-स्टेपानेकची आगेकूच
भारताच्या लिएण्डर पेस याने चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेक याच्या साथीने दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. या जोडीने पाकिस्तानचा एहसाम उल हक कुरेशी व नेदरलँड्सचा जीन ज्युलियन रॉजर यांचा ६-१, ६-७ (३-७), ६-४ असा पराभव केला. पेस व स्टेपानेक यांना आता माईक व बॉब ब्रायन या बंधूंशी खेळावे लागणार आहे. ब्रायन बंधूंनी इंग्लंडच्या कॉलिन फ्लेमिंग व जोनाथन मरे यांना ७-६ (९-७), ६-४ असे हरविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2013 1:31 am

Web Title: murray djokovic move into us open quarterfinals
Next Stories
1 २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या समावेशाची क्रीडा मंत्रालयाची मागणी
2 आंतरराष्ट्रीय यशाचे मैत्रेयी गोगटेचे ध्येय
3 नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार
Just Now!
X