मुंबईच्या आव्हानात्मक ३७१ धावांसमोर खेळताना सातत्याने विकेट्स गमावल्याने मध्य प्रदेशने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत मुंबईविरुद्ध संथ धोरण स्वीकारले. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर खेळताना मध्य प्रदेशने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १९७ धावा केल्या आहेत. नमन ओझा ७९ आणि अंकित दाणे २७ धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी, ७ बाद ३२७ वरून पुढे खेळणाऱ्या मुंबईचा डाव ३७१ धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. मध्य प्रदेशतर्फे चंद्रकांत साकुरेने ५ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशने जलाज सक्सेनाला झटपट गमावले. त्यापाठोपाठ आदित्य श्रीवास्तवही तंबूत परतला. रजत पाटीदार आणि नमन ओझा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. इक्बाल अब्दुल्लाने रजतला बाद करत ही जोडी फोडली. देवेंद्र बुंदेलाला अभिषेक नायरने माघारी धाडले. हरप्रीत सिंग ३६ धावांची खेळी करून बाद झाला. मध्य प्रदेशचा संघ अजूनही १७४ धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ३७१ विरुद्ध मध्य प्रदेश : ५ बाद १९७ (नमन ओझा खेळत आहे ७९, हरप्रीत सिंग ३६, बलविंदर सिंग संधू २/४१)

पुजाराची शतकी खेळी
बडोदा : चेतेश्वर पुजाराच्या संयमी शतकाच्या जोरावर सौराष्ट्रने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत आसामविरुद्ध निसटती आघाडी घेतली. आसामला २३४ धावांत गुंडाळल्यानंतर सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २५४ अशी मजल मारली. ७ बाद १९३ वरून पुढे खेळणाऱ्या आसामचा डाव २३४ धावांत आटोपला. अमित वर्माने ९८, तर अरुण कार्तिकने ५९ धावांची खेळी केली. एका बाजूने सातत्याने सहकारी बाद होत असतानाही पुजाराने खेळपट्टीवर नांगर टाकत शतकी खेळी साकारली. दुसऱ्या दिवसअखेर पुजारा ११६, तर चिराग जाणी २९ धावांवर खेळत आहेत. सौराष्ट्रकडे २० धावांची अल्प आघाडी आहे.