महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आक्रमक स्वभाव असलेल्या विराटलाही कर्णधारपद चांगलंच मानवलं आहे, गेल्या काही वर्षांतला त्याचा फॉम आणि आकडेवारी पाहिली की आपल्यालाही याची खात्री पटेल. असं असलं तरीही इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने कर्णधारम्हणून विराटच्या शैलीत एक दोष सांगितला आहे.

“सगळ्यात पहिले एक गोष्ट मला सांगायला आवडेल की विराटकडे कर्णधार म्हणून स्वतःचा विचार आहे. धोनी कर्णधार म्हणून शांत, संयमी आणि मोजून मापून रिस्क घेत होता. विराट कोहलीचा स्वभाव तसा नाही, तो नेहमी आक्रमक असतो. पण काही गोष्टींवर विराटला काम करण्याची गरज आहे. तो खूप विचार करतो, प्रत्येक षटकानंतर फिल्डींग बदलणं, इकडून तिकडे धावणं, सतत गोष्टी बदलत राहणं…कधीकधी वाटतं तो गरजेपेक्षा खूप जास्त विचार करतो. याचसोबत टीम कॉम्बिनेशन वारंवार बदलणं हा देखील त्याचा एक कच्चा दुवा आहे. या गोष्टींवर विराटला काम करण्याची गरज आहे.” नासिर हुसेन Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यापासून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार असे अनेक विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहेत. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही विराट कोहली कर्णधार म्हणून चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदाही आयसीसीची महत्वाची स्पर्धा जिंकू शकलेला नाही. त्यामुळे आगामी काळात नासीस हुसेनने सांगितलेल्या मुद्द्यांवर विराटला कदाचीत काम करावं लागणार आहे.

अवश्य वाचा – माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतो, पाकिस्तानचा संघ भारताला त्यांच्यात देशात हरवू शकतो !