करोनाच्या साथीमुळे यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा एक किंवा दोन महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून निर्देश मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. परंतु या वर्षी करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुरस्कारांच्या वितरणास विलंब होणार आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही निर्देशांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु राष्ट्रपती भवनाकडून आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. करोनाच्या साथीमुळे सध्या देशात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणे कठीण आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा याआधीही काही वेळा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम २९ ऑगस्टऐवजी एक-दोन महिन्यांत निश्चितपणे होईल. सर्वाची सुरक्षा हेच आता सर्वाधिक महत्त्वाचे आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले.

नियमबदलामुळे मोठय़ा संख्येने अर्ज

करोनाच्या साथीमुळे क्रीडा मंत्रालयाला राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख वाढवावी लागली होती. टाळेबंदीमुळे खेळाडूंना शिफारशीची समस्या भेडसावत असल्याने त्यांना स्वयं-नामनिर्देशित करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मोठय़ा संख्येने पुरस्कारासाठी अर्ज दाखल झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याला एक महिना बाकी असला तरी क्रीडा मंत्रालयाने अद्याप निवड समिती घोषित केलेली नाही. ‘‘क्रीडा मंत्रालयाकडून अद्याप अर्जाची छाननीसुद्धा झालेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करणे आव्हानात्मक ठरेल. त्यामुळे पुरस्कार सोहळा लांबणीवर पडू शकेल,’’ अशी माहिती क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

शेतमजुरी करणाऱ्या शिक्षाला क्रीडा मंत्रालयाची मदत

नवी दिल्ली : करोना साथीमुळे आर्थिक चणचण भासल्याने शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ आलेली हरियाणाची वुशूपटू शिक्षाला केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, राज्य अजिंक्यपद वुशू स्पर्धेत २४ सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या २२ वर्षीय शिक्षाला क्रीडापटूंसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून आर्थिक मदत देण्यात आली आहे. क्रीडा विज्ञान या विषयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या शिक्षाने क्रीडा मंत्रालयाच्या मदतीबद्दल आभार मानले आहेत.