इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूचा मानेला जबर धक्का बसल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून अर्धवटच माघार घ्यावी लागली. त्याशिवाय मार्नस लबुशेनच्या हॅल्मेटलाही चेंडू लागला. त्यामुळे सर्व फलंदाजांसाठी ‘नेक गार्ड’ असलेले हेल्मेट बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी क्रिकेटप्रेमींकडून करण्यात येत आहे.

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्य़ुजचा आखूड टप्प्याचा चेंडू खेळतानाच मृत्यू झाला होता. या घटनेची आठवण करून देताना ऑस्ट्रेलिया संघाचे वैद्यकीय प्रमुख अ‍ॅलेक्स कुंटोरियस यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना उर्वरित अ‍ॅशेस मालिकेत ‘नेक गार्ड’ असलेले हेल्मेट देण्यात यावे, अशी विनंती क्रिकेट मंडळाला केली आहे.

‘‘खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ‘नेक गार्ड’युक्त हेल्मेट फार आवश्यक आहे. अद्यापही काही खेळाडू ते टाळत आहेत. कारण खेळताना त्यांना मान अधिक हलवता येत नाही, हे मान्य आहे. परंतु असे हेल्मेट उत्तम पर्याय आहेत,’’ असे कुंटोरियस म्हणाले.

याव्यतिरिक्त, स्मिथला ८० धावांवर चेंडू लागल्यानंतर त्याला पुन्हा फलंदाजी करण्यासाठी का पाठवले, याविषयी विचारले असता कुंटोरियस म्हणाले, ‘‘संघाचे डॉक्टर रिचर्ड शॉ यांनी स्मिथची योग्य तपासणी केल्यानंतरच त्याला पुन्हा फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. ‘कन्कशन’शी संबंधित बारीकसारीक दुखापतही त्या वेळी आढळली असती तरी, त्यांनी स्मिथला परत फलंदाजी करण्यापासून रोखले असते.’’