करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. सध्या जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. लॉकडाउनमुळे अनेक क्रिकेट बोर्डांना आर्थिक नुकसान होत आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजनही रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघ टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियात ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र ही मालिका रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं संकट अधिक वाढणार आहे. याच कारणामुळे बीसीसीआयनेही ऑस्ट्रेलिया दौरा करण्यासाठी तयारी दाखवली आहे.

या बद्दल अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसला तरीही ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने भारताच्या चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी वेगळी रणनिती आखाली लागेल असं म्हटलं आहे. “२०१८-१९ च्या मालिकेदरम्यान पुजाराने अतिशय चांगली खेळी केली होती. पुजारा मैदानात स्वतःला स्थिरावण्यासाठी बराच वेळ घेतो. त्याचं तंत्र चांगलं आहे त्यामुळे त्याला बाद करणं सोपं नसतं. पुजारा जर गेल्या मालिकेप्रमाणेच खेळणार असेल तर त्याला बाद करण्यासाठी आम्हाला विशेष रणनिती आखावी लागणार आहे. काही वेळा खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नाही, अशावेळी पुजाराला बाद करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.” कमिन्स पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

भारतीय संघाने २०१८-१९ केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने आश्वासक फलंदाजी केली होती. ४ कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-१ च्या फरकाने जिंकली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळपट्टीमध्ये अधिक बाऊन्स असेल अशी आशाही कमिन्सने व्यक्त केली आहे. वर्षाअखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणं अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळावी अशी मागणी करत आहे. बीसीसीआयने मात्र ही मागणी अमान्य केली आहे.