बायच्युंग भूतियानंतर भारतीय फुटबॉलला नवा चेहरा मिळाला तो सुनील छेत्रीच्या रूपाने. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या छेत्रीने भूतियाच्या पावलावर पाऊल टाकत देशातर्फे सर्वाधिक गोल करण्याचा तसेच परदेशी क्लबमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा मान पटकावला. भारताला तीन वेळा नेहरू चषक, एकदा एएफसी चॅलेंज चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉलची सद्यस्थिती, आगामी वाटचाल तसेच परदेशातील अनुभव याविषयी आपली मते मांडली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा विचार करता, भारताची कामगिरी कोणत्या दर्जाची आहे, असे तुला वाटते?
फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याकरिता भारताला वास्तववादी स्वप्ने पाहावी लागतील. सर्वप्रथम आशिया खंडात कामगिरी सुधारावी, त्यानंतरच जागतिक फुटबॉलमध्ये नावलौकिक मिळवण्याचा विचार करावा लागेल. आशियातल्या तसेच राष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचा कामगिरीचा दर्जा सुधारायला हवा. हे सर्व एका दिवसात किंवा एका वर्षांत घडणार नाही. जागतिक क्रमवारीत एका क्रमांकाने झेप घेण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे १५०व्या क्रमांकावरून आपण अव्वल ३० संघांमध्ये पोहोचू शकणार नाही. त्यासाठी हळूहळू यशाची पायरी चढावी लागेल. आशियात पहिल्या १० जणांमध्ये आल्यावरच फिफा विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पाहता येईल.
प्रत्येक खेळात युगपुरुष असतात. त्याचप्रकारे भारतीय संघात एकही प्रेरणादायी फुटबॉलपटू नसल्याची उणीव जाणवते का?
भारतातल्या कोणत्याही स्पर्धा दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होत नाहीत. सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे सामने लोकांना पाहायला मिळाले नसते तर आज ते प्रेरणादायी खेळाडू बनलेच नसते. आय-लीगसारखी राष्ट्रीय स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय सामने पाहायला मिळाले तर अनेक खेळाडू फुटबॉलकडे वळतील. युगपुरुष खेळाडूंपेक्षा खेळ महत्त्वाचा आहे. आय-लीग स्पर्धा संध्याकाळी व्हावी तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर केल्यावर आपोआपच भारतीय चाहत्यांना प्रेरणादायी खेळाडू नक्कीच मिळतील.
परदेशी क्लबमध्ये खेळून मिळालेल्या अनुभवाचा कितपत फायदा होतो?
पोर्तुगालमधील स्पोर्टिग लिस्बन संघाकडून खेळल्याचा अनुभव फारच मोलाचा आहे. भरपूर काही शिकायला मिळत आहे. तसेच अद्ययावत सोयीसुविधांचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. भारतात गुणवत्तेची कमी नाही. त्यामुळे भारताने लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करावे, असे मनोमन वाटत असते, पण इतक्या झटपट ते होणार नाही. त्यासाठी जादूची कांडी फिरवावी लागेल. पोर्तुगालमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, याचे दु:ख जरूर झाले, पण मला अधिक संधी द्यायला हवी होती. भारतीय फुटबॉलपटूंनी परदेशात जाऊन फुटबॉलचे आधुनिक तंत्र शिकावे आणि त्यांनी भारतात अशा अकादमी किंवा क्लब उभाराव्यात, जेणेकरून पुढील १० वर्षांनी भारतातही अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध होतील. लीग स्पर्धा, मैदाने, सोयीसुविधा याबाबतीत सुधारणा केली तर काही वर्षांत भारतीय संघही आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकेल.
आगामी उद्दिष्टे काय आहेत?
आपले लक्ष विचलित होईल, यासाठी मी कधीही मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवत नाही. पुढील सामना, पुढील स्पर्धा, पुढील सराव शिबीर अशी छोटी उद्दिष्टे ठेवत असतो. आय-लीग जिंकण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असल्यामुळे मी या स्पर्धेच्या जेतेपदाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक सामन्यात कामगिरी उंचावण्याचा माझा प्रयत्न असतो.
भारतीय संघाला यशोशिखरावर नेण्यासाठी तुझे प्रयत्न काय असतील?
सर्वप्रथम देशातील जनतेचा दृष्टिकोन बदलायला हवा. भारतात गुणवत्तेची खाण असताना, आपण पुढे का जात नाहीत, हीच चिंता मला सतावत आहे. माझ्या परीने मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, पण खेळाडू, प्रशिक्षक, चाहते, प्रसारमाध्यमे या सर्वानी एकत्र येऊन काम करायला हवे. भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल, तो दिवस आता फार दूर नाही.
आयपीएलसारखी लीग स्पर्धा भारतात व्हावी, असे वाटते का?
यापूर्वी कोलकातात प्रीमिअर लीग फुटबॉलसारखी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू होता, पण काही कारणास्तव तो प्रत्यक्षात साकार होऊ शकला नाही; पण आय-लीग आणि फेडरेशन चषकसारख्या स्पर्धा देशात होत आहेत. अन्य देशातही दोन-तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धा होतात. त्यामुळे भारताला नव्या स्पर्धाची नव्हे तर जुन्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धाना नवी झळाळी देण्याची गरज आहे.