ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी नेदरलँड्सच्या विजयाचा ‘भगवा जल्लोष’ क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाला. प्राथमिक साखळीमधून अव्वल-१० फेरीमध्ये अनपेक्षित स्थान मिळवणाऱ्या नेदरलँड्सचे आव्हान तीन पराभवांमुळे संपुष्टात आले होते. परंतु सोमवारी नेदरलँड्सने आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेत इंग्लंडसारख्या खंद्या संघावर सनसनाटी विजयाची नोंद केली. त्यांनी इंग्लंडचा डाव फक्त ८८ धावांत गुंडाळत ४५ धावांनी शानदार विजय साजरा केला.
विजयासाठी १३४ धावांच्या माफक आव्हानाला सामोरे जाताना इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या लोगान व्हान बीक (३/९) व मुदस्सर बुखारी (३/१२) यांच्या प्रभावी माऱ्यापुढे सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडकडून रवी बोपारा (१५), ख्रिस जॉर्डन (१४) व अ‍ॅलेक्स हेल्स (१२) हे तीनच फलंदाज दोन आकडी धावा करू शकले.
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने २० षटकांत ५ बाद १३३ धावा केल्या. त्यामध्ये वेस्ली बॅरेसीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. सलामीवीर स्टीफन दिबर्गने शैलीदार खेळ करीत ३९ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने २४ धावांत तीन बळी घेतले.
इंग्लंडचा विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी २००९मध्ये त्यांना नेदरलँड्सने पराभूत केले होते. इंग्लंड व नेदरलँड्स यांचे येथील स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. चार सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन गुण जमा आहेत.
संक्षिप्त धावफलक
नेदरलँड्स : २० षटकांत ५ बाद १३३ (वेस्ली बॅरेसी ४८, स्टीफन दिबर्ग ३९; स्टुअर्ट ब्रॉड ३/२४) विजयी वि. इंग्लंड : १७.४ षटकांत सर्व बाद ८८ (रवी बोपारा १८, ख्रिस जॉर्डन १४, अ‍ॅलेक्स हेल्स १२; पीटर बोरेन ३/९, मुदस्सर बुखारी ३/१२)     
सामनावीर : मुदस्सर बुखारी.