युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला 8 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने बांगलादेशला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनामुळे न्यूझीलंडने पाहुण्या बांगलादेशला 131 धावांवरच गारद केले. बांगलादेशचे फलंदाज पूर्ण 50 षटकेही खेळू शकले नाहीत.

 

करोनाच्या प्रतीक्षेनंतर बांगलादेशचा संघ प्रथमच विदेशी दौऱ्यावर गेला आहे. लॉकडाउनमध्ये पुरेसा सराव आणि योग्य प्रशिक्षण न मिळाल्याचे संघाच्या अंदाजावरून जाणवत होते. याचाच फटका म्हणून बांगलादेशला पहिल्या वनडेतच मात खावी लागली.

बोल्टची चमकदार कामगिरी

बांगलादेशच्या डावात स्फोटक फलंदाज महमुदुल्लाने सर्वाधिक 27 धावा केल्या. याशिवाय मुशफिकुर रहीमने 23, लिटन दासने 19 धावा केल्या. कर्णधार तमिम इक्बाल केवळ 13 धावाच करू शकला. दुसरीकडे, जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या माऱ्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बोल्टने 27 धावा देत 4 गडी बाद केले. तर, जेम्स नीशम आणि मिशेल सँटनर यांनी 2-2 बळी घेतले.

न्यूझीलंडचा डाव

प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 21.2 षटकात 2 गडी गमावत हे आव्हान पूर्ण केले. संघाकडून मार्टिन गुप्टिलने 19 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावांची खेळी केली. तर, हेन्री निकोल्स 53 चेंडूत 6 चौकारांसह 49 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूला विल यंग 11 धावांवर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. या विजयामुळे न्यूझीलंडने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशकडून हसन महमूद आणि तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी एक बळी बाद केला. उभय संघातील दुसरा वनडे सामना ख्राइस्टचर्च येथे 23 मार्चला खेळला जाईल.