पहिली कसोटी आजपासून वेलिंग्टनमध्ये

वेलिंग्टन : भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधील आतापर्यंतच्या सर्वात कठीण आव्हानासाठी सज्ज झाला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत शुक्रवारपासून बेसिन रिझव्‍‌र्ह येथे सुरू होणार असून, न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यापुढे भारताचा कस लागणार आहे.

सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत अग्रेसर असून, त्यांच्या खात्यावर ३६० गुण जमा आहेत. परंतु वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारण्यात केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ वाकबगार आहे. न्यूझीलंड संघाने मार्च २०१७ मध्ये मायदेशात अखेरची मालिका गमावली आहे. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी १० पैकी ५ कसोटी सामने जिंकले आहेत.

महिन्याभरापूर्वी ऑस्ट्रेलियातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करला होता. आता या धक्क्यातून सावरत मायदेशात भारतीय संघाविरुद्ध यश मिळवत गुण वाढवण्याची नामी संधी त्यांच्यापुढे असेल.

ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि कायले जॅमीसन यांचा समावेश असलेल्या न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यापुढे पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नव्या सलामीच्या जोडीची परीक्षा ठरणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज नील व्ॉगनरच्या अनुपस्थितीचा दिलासा भारताला असेल.

१०० न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरच्या कारकीर्दीतील हा १००वा सामना असून, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सामन्यांचे शतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू असेल.

भारताने न्यूझीलंड दौऱ्यावरील मालिका जिंकल्यास तो त्यांच्या देशात जाऊन मालिका जिंकणारा मन्सूर अली खान पतौडी (१९६८) आणि महेंद्रसिंह धोनी (२००९) यांचयानंतर तिसरा भारतीय कर्णधार ठरू शकेल.

संघ

भारत (अंतिम १२) : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा.

न्यूझीलंड (अंतिम १२) : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, बीजे वॉटलिंग.

सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजता.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.