भारताची बांगलादेशविरुद्ध आज लढत

सलग दोन विजयाने आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ बुधवारी निदाहास ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून बांगलादेशने स्पध्रेतील चुरस वाढवली आहे. बांगलादेश संघाची ही कामगिरी लक्षात घेता कर्णधार रोहित शर्मा बुधवारी होणाऱ्या लढतीत भारतीय संघात कोणताही बदल करण्याचे धाडस दाखवणार नाही.

भारताला मालिकेच्या सलामीच्या लढतीत यजमान श्रीलंकेकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर भारताने कामगिरी उंचावत दोन विजयाची नोंद केली. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारत उत्सुक आहे. मात्र भारताचा या लढतीत पराभव झाल्यास त्यांना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. हे जरतरचे समीकरण टाळण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.

भारताने या मालिकेसाठी ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली, परंतु अजूनही दीपक हुडा, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना एकही सामना खेळता आलेला नाही. मात्र बांगलादेशला कमी लेखून संघात बदल करण्याचे धाडस दाखवण्याची जोखीम रोहित उचलणार नाही. रोहितचा फॉर्म ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात करता आलेली नाही. सुरेश रैना आणि मनीष पांडे यांनी मधल्या फळीत चांगला खेळ केला, तर दिनेश कार्तिकनेही योगदान दिले आहे. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर व जयदेव उनाडकट यांच्यावर जबाबदारी आहे.

संघ

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).
  • बांगलादेश : महमदुल्ला (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रुल कायेस, मुशफिकर रहिम (यष्टिरक्षक), शब्बीर रेहमान, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसेन, तस्कीन अहमद, अबू हिदर, अबू जायेद, अरिफूल हक, नझ्मूल इस्लाम, नुरूल हसन, मेहिदी हसन, लिटन दास.
  • सामन्याची वेळ : सायं. ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : डीस्पोर्ट्स, जिओ टीव्ही अ‍ॅप, रिश्ते सिनेप्लेक्स.

प्रमुख गोलंदाजांची अनुपस्थिती भरून काढण्याची क्षमता -शार्दूल

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमरा यांची अनुपस्थिती भरून काढण्याची क्षमता माझ्याकडे आहे व ते मी सिद्ध केले आहे, असे मुंबईचा गोलंदाज शार्दूल ठाकूरने सांगितले.

शार्दूलने श्रीलंकेविरुद्धच्या विजयात चार बळी टिपत महत्त्वाचा वाटा उचलला. तो म्हणाला, ‘‘मला नेहमी आव्हानाला सामोरे जाणे आवडते. भुवी व बुमरा यांच्या अनुपस्थितीत प्रभावी मारा करण्याची माझ्यावर जबाबदारी होती. मी यापूर्वी स्थानिक सामन्यांमध्ये अशा पेचप्रसंगी यशस्वी कामगिरी केली आहे. रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना अजित आगरकर, झहीर खान व धवल कुलकर्णी यांच्या अनुपस्थितीत संघाला विजय मिळवून देण्यात मी खारीचा वाटा उचलला आहे. त्या अनुभवाचा फायदा येथे झाला.’’

द्रुतगती गोलंदाज कधी कधी अचानक चेंडूचा वेग कमी ठेवीत गोलंदाजी करतात. मीदेखील तसा प्रयत्न येथे केला आणि सुदैवाने त्यामध्ये यश मिळाले,  असे सांगून ठाकूर म्हणाला, ‘‘अशा तंत्राचा मी भरपूर सराव केला आहे. जेव्हा जेव्हा स्थानिक सामन्यांमध्ये पांढऱ्या चेंडूवर खेळण्याची संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा मी हे तंत्र वापरले आहे.  वेगवेगळी शैली वापरली तर आणखी चांगले यश मिळते.’’