Nothing is Impossible या वाक्याचा अर्थ काल दिनेश कार्तिकने खऱ्या अर्थाने स्पष्ट करुन सांगितला. निदहास चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर ४ गडी राखून मात केली आणि तिरंगी मालिकेचं विजेतेपद पटकावलं. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरच्या वरुन खणखणीत षटकार खेचला, आणि सर्व भारतीय खेळाडूंनी मैदानात येत एकच जल्लोष केला.

अवश्य वाचा – India vs Bangladesh T20 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताने मिळवला विजय

दरम्यानच्या काळात कालच्या सामन्यात दोन्ही संघांकडून १३ विक्रमांचीही नोंद केली. सोशल मीडियावरही भारतीय पाठीराख्यांनी बांगलादेशी संघाला ट्रोल करत विजयोत्सव साजरा केला.

अवश्य वाचा – नागिन डान्स बांगलादेशवरच उलटला, मीम्समधून भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी संघाला केलं ट्रोल

१ – लागोपाठ ३ टी-२० मालिकांचं विजेतेपद पटकावणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.

१ – अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावा हव्या असताना षटकार खेचून सामन्याचा शेवट करणारा दिनेश कार्तिक पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

३ – टी-२० क्रिकेटमध्ये ७ हजार पेक्षा जास्त धावा काढणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

४ – टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून १ हजार धावा पूर्ण करणारा मेहमदुला चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी बांगलादेशकडून तमिम इक्बाल, शाकीब अल हसन आणि मुश्फिकुर रहीम यांनी १ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

४ – टी-२० मालिकेच्या अंतिम फेरीत अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्मा चौथा कर्णधार ठरला आहे.

८ – टी-२० क्रिकेटमध्ये मेहमदुला आतापर्यंत ८ वेळा धावबाद झाला आहे. मेहमदुलाने केन विलियमसन आणि समिउल्ला शेनवारी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

८ – वॉशिंग्टन सुंदरने या मालिकेत ८ बळी घेतले आहेत. २० व्या वर्षात कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी श्रीलंकेच्या अकिला धनंजयाच्या नावावर हा विक्रम जमा होता.

८ – बांगलादेशविरुद्ध गेल्या आठही टी-२० सामन्यांमध्ये भारताने विजय संपादन केला आहे.

१३ – टी-२० क्रिकेटमध्ये ५०० धावा पूर्ण करण्यासाठी लोकेश राहुलने तब्बल १३ डाव घेतले आहेत.

१६ – टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी करण्याची रोहित शर्माची ही सोळावी वेळ ठरली. या यादीमध्ये विराट कोहली रोहित शर्माच्या पुढे आहे. विराटच्या नावावर १८ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

६१ – भारताने आतापर्यंत ६१ टी-२० सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. पाकिस्तान या निकषात ७४ सामने जिंकत भारताच्या पुढे आहे.

६१.१६ – टी-२० मालिकेच्या अंतिम सामन्यात सुरेश रैनाची ६१.१६ सरासरी ही सर्वोत्तम मानली जात आहे.

१६७ – टी-२० मालिकेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर. भारताने बांगलादेशचं १६७ धावांचं आव्हान पूर्ण केलं, याआधी वर्ल्ड टी-२० २०१६ स्पर्धेत वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत इंग्लंडचं १५६ धावांचं आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं.

अवश्य वाचा – ….म्हणून रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा तो षटकार पाहिलाच नाही!