उदयोन्मुख सलामीवीर फलंदाज जय बिस्ताला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.  आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात तो उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करण्याची दाट शक्यता आहे.

‘‘काही दिवसांपूर्वी जयने अन्य राज्य संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. शुक्रवारी दुपारी ‘एमसीए’ने त्याच्याकडे ते सुपूर्द केले,’’ अशी माहिती ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जयने २६ प्रथम श्रेणी सामन्यांत ३३च्या सरासरीने १,४८६ धावा केल्या आहेत. त्याने नोव्हेंबर २०१५ मध्ये मुंबई संघात पदार्पण केले होते; परंतु नंतर त्याला वगळण्यात आले. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ भारताचे प्रतिनिधित्व करत असतानाही जयची मुंबईकडून खेळण्याची प्रतीक्षा संपली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करूनही मुंबई संघातून डावलण्यात येत असल्यामुळे निराश जयने अन्य संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला असावा. स्थानिक क्रिकेट गाजवणारा वसिम जाफर सध्या उत्तराखंडचा प्रशिक्षक असल्याने जयला या संघाकडून खेळण्याचा प्रस्ताव आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.