बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत भारताचा फिरकीपटू आर. अश्विन यानं ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टिव्ह स्मिथला चांगलेच सतावलं आहे. दोन्ही कसोटी सामन्यात अश्विनच्या गोलंदाजीवर खेळताना स्मिथ अडखळत होता. अश्विननं या मालिकेत दोन वेळा स्मिथला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. स्मिथला दोन्ही कसोटी सामन्यात फक्त १० धावाच करता आल्या.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यानंतर बोलताना स्मिथनं अश्विनच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तो म्हणाला की, ‘दोन्ही कसोटी सामन्यात अश्विननं चांगली केली. दोन्ही कसोटी सामन्यात मी अश्विनला माझ्यावर वरचढ ठरण्याची संधी दिली, कारकिर्दीमध्ये मी दुसऱ्या कोणत्याही फिरकी गोलंदाजाला असं करून दिलं नाही.’
सेन रेडियोसोबत बोलताना स्मिथ म्हणाला की, अश्विनच्या गोलंदाजीवर जसं हवं तसा मला खेळता आलं नाही. अश्विनवर दबाव टाकायला हवा होता. पुढील सामन्यात आत्मविश्वासाने स्वाभाविक खएळावर लक्ष द्यावं लागेल. मैदानावर पाय स्थिरावून फलंदाजी करण्याची इच्छा आहे. ज्याची पुढील सामन्यात गरज आहे. नेटमध्ये तुम्ही कितीही सराव करा, पण मैदानातली गोष्ट वेगळी असते. मी मैदानात लय मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहे. हे एवढं सोपं नाही, कारण समोरच्या संघाकडे एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहेत.
आणखी वाचा- “भारतानं ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारलं”; रावळपिंडी एक्सप्रेसने अजिंक्यचंही केलं कौतुक
अॅडलेड कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघानं फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला. बॉर्डर गावसकर मालिकेत भारतीय संघानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. सात जानेवारी रोजी सिडनी येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे.