मारिओ गोएट्झने केलेल्या दोन गोलच्या जोरावर जर्मनीने पोलंडवर ३-१ अशी मात केली आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी गटात आघाडीचे स्थान मिळवले. उत्तर आर्यलडनेही बाद फेरीतील आव्हान टिकवताना फरोई आयलंड्सचा ३-१ असा पराभव केला.

विश्वविजेत्या जर्मनीला गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पोलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाची परतफेड करताना जर्मनीच्या खेळाडूंनी सुरेख खेळ केला. थॉमस म्युलरने जर्मनीचे खाते उघडले. त्यानंतर मारिओने दोन गोल करीत संघाची बाजू बळकट केली. पोलंडचा एकमेव गोल त्यांचा कर्णधार रॉबर्ट लेवांदोवस्कीने नोंदवला. जर्मनीचे १६ गुण झाले आहेत, तर पोलंडच्या खात्यावर १४ गुण आहेत. त्यांची आता सोमवारी ग्लासगो येथे स्कॉटलंडशी गाठ पडणार आहे.
साखळी ‘एफ’ गटात उत्तर आर्यलडने आतापर्यंत १६ गुण मिळवले असून मुख्य फेरीसाठी त्यांना आणखी एक सामना जिंकावा लागणार आहे. त्यांच्या विजयात गॅरेथ मॅकऑलीने महत्त्वाची कामगिरी केली. त्यांचा तिसरा गोल काईल लॅफर्टीने केला. रुमानियाने १५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांनी हंगेरीला गोलशून्य बरोबरीत रोखले.
आर्यलड प्रजासत्ताक संघाने जिब्राल्टर संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. त्या वेळी कर्णधार रॉबर्ट किएनीने दोन गोल करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सायरस ख्रिस्ती व शेन लाँग यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. आर्यलडचे १२ गुण झाले आहेत. अन्य लढतीत जॉर्जियाने स्कॉटलंड संघावर १-० अशी मात केली.
फिनलंड संघाने ग्रीस संघावर १-० असा निसटता विजय मिळविला. युरो स्पर्धेतील मुख्य फेरीचे सामने आयोजित करणाऱ्या फ्रान्सने पोर्तुगाल संघाचा १-० असा पराभव केला. त्यांचा हा एकमेव गोल मथियू व्हॅल्बुना याने फ्रीकिकद्वारा केला. पोर्तुगालची अल्बेनियाशी सोमवारी गाठ पडणार आहे.