माझ्या वडिलांनी मला एक शिकवण दिली. तू कितीही चांगला क्रिकेट खेळलास तरी ते तुला २० वर्ष पुरेल. त्यापुढच्या काळात काय करशील? त्यामुळे केवळ चांगला खेळाडूच नाही, तर चांगला माणूस म्हणून या जगात राहणं महत्वाचे आहे, असे मला माझ्या वडिलांनी सांगितले होते. हाच संदेश या मुला-मुलींना देण्यासाठी मी येथे आलो आहे, असे असे प्रतिपादन भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले. पुण्यातील द बिशप्स स्कूल येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीच्या शिबिरामध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित आहे. त्यावेळी तो पत्रकारांशी संवाद साधत होता.

जगात चांगला खेळाडू होणे हे आवश्यक असते. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे चांगला माणूस आणि चांगला नागरिक होणे. त्यामुळे फक्त मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही सामाजिक जबाबदारी घ्यायला शिका. हा संदेश देण्यासाठी मी येथे आलो आहे, असे त्याने स्पष्ट केले.

२९ वर्षांपूर्वी आजच मी भारतासाठी पहिला सामना खेळला. दिवस खूप पटापट निघून गेले. पण आजही मला क्रिकेटबाबत तितकीच आपुलकी आणि प्रेम आहे. कारण क्रिकेटच्या मैदानापासून मी दूर असलो तरी क्रिकेट मात्र अजून माझ्या हृदयात आहे, असेही तो म्हणाला.

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिबिरे घेतली जात असून या शिबिरांमध्ये सचिन, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि तज्ज्ञ खेळाडू ग्रामीण आणि निमशहरी भागातील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहेत. पुण्यातील द बिशप्स स्कूल येथे १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.