भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारपासून (२ मार्च) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. टी २० मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. या मालिकेत भारताकडून लोकेश राहुलने २ अर्धशतके झळकावली. पण विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी आक्रमक खेळी करत प्रेक्षकांची मने जिंकली. विराटने ३८ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. तर मॅक्सवेलने ५५ चेंडूत ११७ धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याला सर्वात आक्रमक आणि धोकादायक फलंदाज असल्याचे म्हटले आहे.

फिंचइतका आक्रमक आणि स्फोटक फलंदाज कोणीही नाही. फिंच जेव्हा लयीत असतो, तेव्हा तो खूप धोकादायक आणि स्फोटक खेळी करू शकतो. निर्धारित षटकांच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून जेव्हा धावा निघण्यास सुरुवात होते, तेव्हा तो गोलंदाजांची कर्दनकाळ ठरतो. फिंच हा अत्यंत उत्तम खेळाडू आहे. कर्णधार म्हणून देखील तो उत्कृष्ट आहे. त्यामुळे तो लवकरच लयीत परतेल असा विश्वास लँगर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

फिंचला योग्य तो पाठिंबा देणे गरजेचे आहे. तो व्यक्ती म्हणून उत्तम आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने आणि क्रीडाप्रेमींनी त्याला पाठिंबा दिला तर तो त्याच्या खऱ्या लयीत परत येईल. आपण फक्त त्याला चांगला खेळ करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. तसे झाल्यास तो लयीत परतेल. त्याच्या बॅटमधून नक्की धावा निघतील. जगातील धोकादायक आणि आक्रमक अशा फलंदाजांची जेव्हा गणना केली जाते, तेव्हा सर्व फलंदाजांपेक्षा मला फिंच हाच सर्वात आक्रमक खेळाडू वाटतो. कारण त्याला ज्यावेळी सूर गवसतो, तेव्हा सर्वात धोकादायक फलंदाज ठरतो, असेच लँगर म्हणाला.